एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. आज 22 डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी बोली लावण्यासाठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ 2.94 पटीने सबस्क्राईब झाला आहे. संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (elin-electronics-ipo-subscribed-294-times-on-final-day)
शेअर बाजाराच्या माहितीनुसार एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ 2.94 पटीने सबस्क्राईब झाला आहे. कंपनीला दुपारपर्यंत 4.71 कोटी शेअर्सच्या खरेदीसाठी अर्ज प्राप्त झाले. कंपनी आयपीओमधून 1.42 कोटी शेअर्स इश्यू करणार आहे. काल बुधवारी दुसऱ्या दिवसअखेर आयपीओतील शेअर्सची मागणी 95% ने भरली होती.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा (Retail Investor's portion) 2.06 पटीने सबस्क्राईब झाला आहे. उच्च नेटवर्थ असलेल्या गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 3.24 पटीने सबस्क्राईब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा राखीव हिस्सा 4.24 पटीने सबस्कराईब झाला आहे.
एलिन इलेक्ट्रॉनिक्स आयपीओमधून 475 कोटींचे भांडवल उभारणार आहे. त्यापैकी 175 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 300 कोटींचे शेअर्स प्रमोटर्सकडून विक्री करण्यात येणार आहेत. आयपीओसाठी 234 ते 247 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वीच अॅंकर गुंतवणूकदारांकडून 142 कोटींचा निधी उभारला होता.
एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे बाजार भांडवल 1226.6 कोटी इतके आहे. आयपीओतून प्राप्त होणाऱ्या भांडवलातून कर्ज फेड करण्यात येणार आहे. तसेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि गोव्यातील वेर्ना येथील प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी निधीचा वापर केला जाईल,असे कंपनीने म्हटले आहे.