घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयारी करणाऱ्या एलिन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा 475 कोटींचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. IPO मध्ये कंपनीने प्रती शेअर 234 ते 247 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. कंपनी फ्रेश इश्यूमधून 175 कोटींचे भांडवल उभारणार आहे. ऑफर फॉर सेलमधून 300 कोटींचा निधी उभारण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. (Elin Electronics Limited IPO)
एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ हा वर्ष 2022 मधील भांडवली बाजारातला शेवटचा इश्यू ठरण्याची शक्यता आहे. कंपनीने अॅंकर गुतवणूकदारांकडून 142.5 कोटी उभारले आहेत. अॅंकर गुंतवणूकदारांना 57.69 लाख शेअर्सचे वाटप करण्यात आले.
एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर आज ग्रे मार्केटमध्ये देखील दाखल झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये प्रती शेअर 43 रुपयांचा प्रिमियम आहे. कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यामुळे या आयपीओला प्रभुदास लिलाधर, रिलायन्स सिक्युरिटीज, हेम सिक्युरिटीज, कॅनरा बँक सिक्युरिटिज, स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट यांनी सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे.
गुंतवणूकदारांना किमान 60 शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे.वैयक्तिक गुंतवणूकदार किमान एक लॉट आणि कमाल 13 लॉटसाठी अर्ज करु शकतात.आज सकाळी 11.30 वाजेपर्यंत एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ 0.11 पटीने सबस्क्राईब झाला होता.30 डिसेंबर 2022 रोजी एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर भांडवली बाजारात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
एलिन इलेक्ट्रॉनिक्सची प्रोफाईल
एलिन इलेक्ट्रॉनिक्सकडून घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार केली जातात.ज्यात लाईट्स, किचन अपलायन्सेस, फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर निर्मिती करणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे.इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस बाजारपेठेमध्ये एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा 7% हिस्सा आहे. कंपनीचा PE Valuation 25.75 आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस बाजारपेठ 9.96 लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या या बाजारपेठेची उलाढाल 2.65 लाख कोटी आहे. त्यामुळे एलिन इलेक्ट्रॉनिक्सकडे प्रचंड संधी आहे.