मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अॅक्सेसरीजच्या किंमती मार्च-मे दरम्यान वाढण्याची भीती उत्पादक कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार होत असून जर ही लाट अशीच सुरू राहीली तर चीनमधून भारतात आयात होणाऱ्या सुट्या पार्टसच्या किंमती वाढू शकतात, अशी शक्यता आहे. भारतामध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सच्या किंमती वाढल्या होत्या. भारतीय स्थानिक बाजारात त्यामुळे तुटवडा निर्माण झाला होता.
आगाऊ ऑर्डर्स वेळेत मिळण्यास अडचण
चीनमध्ये जानेवारीच्या शेवटी चिनी नववर्षाच्या सुट्या सुरू होत आहेत. तेव्हा सुमारे पंधरा दिवस सुट्या असतात. या काळातही उत्पादन बंद राहील. त्याआधी जर कोरोनाची लाट नियंत्रणात आली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या भारतीय व्यापाऱ्यांनी दिलेल्या मालाच्या ऑर्डर्स वेळेत येत नाहीत. तसेच सुट्या स्पेअर्सपार्टच्या ऑर्डर कधीपर्यंत मिळतील, याचे आश्वासक उत्तरही मिळत नाही. जर कोविड वाढला तर भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
कारखान्यांत कामगारांची कमतरता
पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अनेक व्यापारी आगाऊ ऑर्डर देऊन ठेवत आहेत. मात्र, या आगाऊ मालाची डिलिव्हरी कधी मिळेल हे नक्की सांगता येत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. सध्या कोरोनामुळे चीनमधील कारखान्यांमध्ये ३० ते ५० टक्के कमी क्षमतेने कामगार येत आहेत. त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होत आहे.
चिनी नववर्षानंतरही चीनमध्ये कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या स्पेअर पार्ट्सचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन सह अनेक वस्तुंची बाजारातील उपलब्धता कमी होईल, असे कार्बन मोबाईल ब्रँडचे प्रमुख प्रदीप जैन म्हणाले. बंदरावरील शिपमेंट कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने चीनमधून आलेल्या माल उतरवण्यातही अडथळा निर्माण झाला आहे. सध्या कसेबसे काम सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाल्यानंतर मालाचा तुटवडा भासू शकतो, असेही ते म्हणाले.