देशाच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून फास्टर अॅडॉप्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग (FAME 2) या योजने अंतर्गत ग्राहकांना सबसिडी देण्यात येत होती. त्या सबसिडीमध्ये 1 जूनमध्ये कपात करण्यात आली होती. त्या कपातीचा इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीला फटका बसला होता. दरम्यान, आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा इ-दुचाकीच्या विक्रीमध्ये तेजी आल्याची आकडेवारी पुढे आली आहे. जून महिन्याच्या तुलनेत या महिन्यात 17 जुलै पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकींच्या सरासरी दैनंदिन विक्रीमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
17 दिवसात 28,937 इ- दुचाकींची विक्री-
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या VAHAN पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या पहिल्या 17 दिवसांत ई-दुचाकी वाहनांची सरासरी दैनंदिन विक्री 1,702 युनिट्सपर्यंत वाढली आहे. तर जूनमध्ये सरासरी 852 युनिट्सची विक्री झाली होती. थोडक्यात 1 जुलै ते 17 जुलै या कालावधीत एकूण 28,937 ई-वाहनांची विक्री झाली आहे. तर जूनमध्ये एकूण 14,499 इ-वाहनांची विक्री झाली होती.
सबसिडी कपातीनंतर आली होती घट
सुरुवातीला, सबसिडी कपातीचा ई-टू-व्हीलर मार्केटवर नकारात्मक परिणाम झाला होता. त्यामुळे दुचाकीच्या विक्रीत घट झाली होती. जूनमध्ये ई-टू-व्हीलरची विक्री जवळपास 60 टक्क्यांनी घसरून 42,124 युनिट्सवर आली. तर मे महिन्यात ती 1,05,348 युनिटच्याच्या विक्रीसह सर्वाधिक उच्चांकावर होती. FAME 2 अंतर्गत ऑफर केलेल्या अधिक प्रोत्साहनावर ग्राहकांनी गर्दी केल्याने मे महिन्यात विक्री वाढली होती. दरम्यान, केंद्र सरकारने 1 जूनपासून ई-टू-व्हीलरसाठी सर्वाधिक सबसिडी 60,000 रुपयांवरून 22,500 रुपयांपर्यंत कमी केली. यासह, 80,000 ते 1,50,000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या ई-टू व्हीलरची सरासरी किंमत 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यामुळे खरेदीमध्ये घट झाली होती.
सबसिडी कमी करूनही विक्रीमध्ये सुधार
सरकारने ई दुचाकीच्या सबसिडीमध्ये कपात केल्यानंतर पुन्हा एकदा विक्रीमध्ये तेजी दिसून येत आहे. विक्रीतील ही वाढ ई-टू-व्हीलरबद्दल ग्राहकांमध्ये सकारात्मक बदल दर्शवते आहे आणि तो बदल चालूच राहण्याची शक्यता असल्याचे वाहन उद्योगातील तज्ञांचे मत आहे. जूनच्या पहिल्या 15 दिवसांत दररोज सरासरी 721 वाहनांची विक्री झाली. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात (16 जून ते 30 जून) विक्री वाढून 2,332 झाली होती.
विक्रीमध्ये आणखी वाढ होईल
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी दैनंदिन 1,702 वाहनांची विक्री झाली. तर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात नोंदवलेल्या विक्रीपेक्षा (2,332) जूनमधील विक्री कमी असली तरी पावसाळ्यानंतर त्यात मोठी वाढ होण्याची अपेक्षाही जाणकारांनी व्यक्त केली आहे. सिंग म्हणाले की, जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी दैनंदिन विक्री मुसळधार पावसामुळे कमी झाली असावी, ज्याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर भागांसारख्या प्रमुख ई-टू-व्हीलर मार्केटवर झाला आहे.
सध्या विकल्या जाणार्या बहुतांश ई-टू व्हीलरची किंमत रु. 1,20,000 ते रु. 1,50,000 आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींच्या किमती कमी आहेत (रु. 90,000 ते रु. 1,10,000), ज्यामुळे ग्राहकांची पेट्रोलच्या दुचाकींना जास्त पसंती आहे.