Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Edible oil price fall : वाढत्या मागणीनंतर तेलबियांच्या दरात घसरण, खाद्यतेल स्वस्त?

Edible oil price fall : वाढत्या मागणीनंतर तेलबियांच्या दरात घसरण, खाद्यतेल स्वस्त?

Edible oil price fall : सूर्यफूल आणि सोयाबीन यासारख्या स्वस्त आयात केलेल्या तेलाची मागणी वाढलीय. त्यामुळे शनिवारी राजधानी दिल्लीत तेलबियांच्या बाजारात किंमती घसरल्याचं दिसून आलं. मोहरी आणि सोयाबीनच्या किंमतीत किंचित घट झाली. एकूणच इतर तेलबियांच्या बाबतही दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.

खाद्यतेलाच्या बाजारात (Edible oil) अचानक मागणी वाढली. तेलबियांमध्ये कापूस तेल, शेंगदाणा तेल, कच्चं पाम तेल (Crude palm oil) आणि पामोलिनचे भाव सामान्य व्यवसायाच्या दरम्यान मागच्या स्तरावर बंद झाले. बाजारातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी विदेशी बाजार बंद होते. अमेरिकेतलं शिकागो एक्सचेंज शुक्रवारी बंद होतं. आता सोमवारी बाजार उघडल्यानंतरच पुढचा कल कळू शकणार आहे. झी बिझनेसनं ही बातमी दिलीय.

मोहरीचा वापर करणं कठीण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मोहरीची किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) प्रति क्विंटल 5,050 रुपये होती. त्या वर्षीही शेतकऱ्यांनी मोहरीचं चांगलं उत्पादन घेतलं होतं. असं असतानाही त्याला प्रतिक्विंटल 6,500-7,000 रुपये जास्त भाव मिळाला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन त्यांनी यंदाही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची शुल्कमुक्त आयात आणि परदेशात या तेलांच्या किंमती घसरल्यानं बाजारात मोहरीचा वापर करणं कठीण झालं आहे.

सूर्यफुलावरचं आयात शुल्क 5.5 टक्के

देशातल्या बंदरांवर सूर्यफूल तेलाची घाऊक किंमत 80 रुपये प्रति लिटर आहे. तर मोहरीच्या तेलाची किंमत सुमारे 125 रुपये प्रति लिटर आहे. परंतु किरकोळ बाजारात प्रिमियम दरानं विकलं जात असल्यानं सूर्यफूल तेल 130-140 रुपये प्रतिलिटर दरानं उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यफूल तेलाची आयात किंमत 1,450 डॉलर प्रति टन होती. त्यामुळे 38.5 टक्के आयात शुल्क लागू होतं. काही दिवसांनंतर, जेव्हा सूर्यफूल तेलाची किंमत प्रति टन 2,500 डॉलरवर पोहोचली. तेव्हा सरकारनं शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. त्याच तेलाची किंमत प्रति टन 1,050 डॉलरपर्यंत घसरली आहे. त्यामुळे एप्रिलपासून त्यावर 5.5 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे.

...तर मोहरीचीही अवस्था सूर्यफुलासारखी

स्वदेशी तेलबियांची बाजारपेठ विकसित करण्यासाठी सरकारला स्वदेशी तेलबियांच्या वापराला प्राधान्य देऊन त्यानुसार दर निश्चित करावे लागणार आहेत. नाही तर खाद्यतेलात स्वयंपूर्णता मिळवणं हे स्वप्नच राहू शकतं. गेल्या वर्षी जेव्हा आयात केलेल्या नरम तेलाची किंमत मोहरीपेक्षा 30 रुपये प्रतिकिलो जास्त होती, तेव्हा देशातील शेतकऱ्यांना मोहरीच्या पिकाला पूर्ण भाव मिळाला आणि मोहरीच्या डी ऑइल केकची (De Oiled Cake) निर्यात करून परकीय चलनही कमावलं. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी मोहरीचं पीक घेतलं नाही तर मोहरीचीही अवस्था सूर्यफुलासारखी होण्याची भीती व्यक्त होतेय.

सूर्यफुलाची लागवड केवळ 10 टक्क्यांपर्यंत कमी

पूर्वी देशात सूर्यफुलाचं पुरेसं उत्पादन होतं. मात्र आज उच्च एमएसपी (Minimum Support Price) असूनदेखील सूर्यफुलाची लागवड केवळ 10 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तेलबियांचे भाव वाढले, की सर्वत्र बराच गदारोळ होतो. मात्र तेलबियांच्या व्यवसायात दुधाचा व्यवसाय अविभाज्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तेलबियांच्या किंमतीत शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतोय. त्यामुळे उत्पादन वाढेल आणि देश तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, तेलबियांचा दरडोई वापर दुधाच्या तुलनेत खूपच कमी आहे.