आघाडीच्या ऑनलाईन पेमेंट गेटवे कंपन्यांवर आज सक्तवसुली संचनालयाच्या तपास (ED) पथकाने छापे मारले. पेटीएम कंपनीच्या प्रमुख शहरांमधील कार्यालयांमध्ये आज बुधवारी 14 सप्टेंबर 2022 रोजी ईडीकडून तपास करण्यात आला. या कंपन्यांच्या पालक कंपन्या किंवा मुख्य गुंतवणूकदार चीनमधील असून त्यांच्याकडून या कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जात आहे. बनावट कागदपत्रांद्वारे तयार केलेले मर्चंट आयडी आणि बँक खात्यातील 17 कोटींची संशयास्पद रोकड ईडीने जप्त केली आहे.
पेटीएम (Paytm) आणि पेयू (PayU) या कंपन्यांची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन या कंपनीच्या मुंबई, दिल्ली, गुडगाव, लखनऊ, कोलकाता या शहरांतील कार्यालयांमध्ये आज ईडीच्या तपास पथकाने धाड टाकली.चायनीज लोन अॅपशी संबध असल्याबाबत पेटीएम आणि पेयूची चौकशी करण्यात आली आहे. बंगळुरातील सहा कार्यालयांमध्ये आज ईडीचा तपास सुरु होता.
ईडीने यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी बंगळुरातील पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस, रेझरपे पेमेंट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये धाडी टाकल्या होत्या. या कंपन्या स्मार्टफोनद्वारे तात्काळ कर्ज देण्याचा व्यवसाय करतात. मात्र या कंपन्यांना चीनमधून नियंत्रित केले जाते, असा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इन्स्टंट लोन देणे आणि ते वसूल करताना कर्जदाराचा छळ करण्याच्या घटना मागील काही महिन्यांत वाढल्या आहेत. या प्रकरणी बंगळुरु सिटी सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये 18 गुन्हे दाखल झाले आहेत. ईडीच्या चौकशी दरम्यान या कंपन्यांचे सूत्रधार चीनमधले असल्याचे उघड झाले आहे. भारतीय ग्राहकांचे बनावट दस्तावेज वापरुन त्यांना बोगस कंपन्यांचे संचालक दाखवण्यात आले आहे. या कंपन्यांचे मर्चंट आयडी (Merchant ID) आणि बँक खाती सुरु करुन त्याद्वारे मोठे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या कंपन्यांनी गुन्हा केला असल्याचे ईडीने म्हटलं आहे.
या बनावट कंपन्यांचा डेटा हा बनावट आहे. पेमेंट गेटवे आणि बँकांकडे या कंपन्यांचा उपलब्ध असलेला पत्ता हा कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (MCA) वेबसाईट आणि नोंदणी दस्तमधील पत्ता ही माहिती जुळत नाही. त्यामुळे बनावट पत्ता दाखवून मर्चंट आयडी आणि बँक अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. चीनी व्यक्तींकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपन्यांमधील मर्चंट आयडी आणि बँक खात्यातून ईडीने 17 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा तपास संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होता. काही मर्चंटची केवायसी आणि इतर माहितीची छाननी ईडीकडून केली जात आहे. मागील सहा महिन्यांपासून ईडीने तपास सुरु केला असल्याचे रेझरपे पेमेंट्सच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. पेटीएमने देखील ईडीच्या तपास मोहीमेबाबत दुजोरा दिला आहे. ईडी काही मर्चंटची माहिती घेत असून तपासाला कंपनी पूर्ण सहकार्य करेल, असे पेटीएमच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.