भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये रेल्वेचा मोठा आहे. दरररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. याशिवाय, रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे आधुनिकीकरण करावे अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन रेल्वे मार्गांना मंजूरी दिली आहे.
सरकारने 8 नवीन रेल्वे मार्गांसाठी जवळपास 24,657 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नवीन मार्गामुळे रेल्वेचा प्रवास अधिक जलद, सुखरूप होण्यास मदत होईल. तसेच, यामुळे पर्यटन आणि व्यापाराला देखील अधिक चालना मिळेल.
नवीन रेल्वे मार्ग कोणते?
सरकारने 900 किमी लांबीच्या 8 नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. हे नवीन मार्ग 7 राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांना जोडणार आहे. ज्या राज्यातून हे नवीन रेल्वे मार्ग जाणार आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगानाचा समावेश आहे.
नवीन रेल्वे मार्गांवर 64 स्टेशन देखील उभारण्यात येतील. हा मार्ग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील जालना-जळगाव मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे. 510 गावातील जवळपास 40 लाख लोकसंख्या यामार्गाशी जोडले जाते. या संपूर्ण मार्गाचे काम वर्ष 2031 पर्यंत पूर्ण होईल.
रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर
सरकारकडून रेल्वेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. नवीन मार्गिका बांधल्या जात आहेत. जास्तीत जास्त जिल्ह्यातील ग्रामीण भागांना रेल्वे मार्गाशी जोडण्यात येत आहे. याशिवाय, सर्व सोयी सुविधा असलेले डब्बे, चांगले रेल्वे स्टेशन, अत्याधुनिक इंजिन असलेल्या रेल्वेचा ताफ्यात समावेश केला जात आहेत. वंदे भारत, अमृत भारत सारख्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या रेल्वेंचा ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
नवीन रेल्वे मार्गाचा काय फायदा होणार?
8 नवीन रेल्वे मार्ग 7 राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांना जोडणार आहेत. यामुळे पर्यटन, व्यापार व प्रवासी वाहतुकीला फायदा मिळणार आहे. रेल्वे मार्गाच्या मदतीने कोळसा, सिमेंट, पोलाद सारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या नवीन मार्गामुळे या व्यापारात अधिक वाढ होईल. याशिवाय, कृषीउत्पादने देखील जलद इतर राज्यात पोहचविण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात जालना-जळगाव ही नवीन मार्गिका बांधली जाणार आहे. यामुळे मराठवाडा - उत्तर महाराष्ट्रातील प्रवास अधिक जलद होईल. हा मार्ग अजिंठा लेण्यांना देखील जोणार आहे. त्यामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल.