e-Gram Swaraj: तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गावासाठी सरकारने किती निधी उपलब्ध करून दिला आहे? त्या निधीतून किती रुपयांची कामे पूर्ण झाली? गावातील कोणकोणती कामे पूर्ण झाली? त्याची किती रुपयांची बिले मंजूर करण्यात आली? असा सर्व लेखाजोखा तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर पाहू शकता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याबाबत ग्रामपंचायतीपासून जिल्हाध्याक्षापर्यंत सर्व यंत्रणेला जाब विचारू शकता.
आपण अनेकदा वृत्तपत्रात छापून आलेल्या आश्चर्यकारक बातम्या वाचतो. जसे की, एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीची चोरी होते किंवा रातोरात रस्ता गायब झाला. ग्रामपंचायतीची स्कीम रातोरात संपते. या बातम्या तशा खोट्या नसतात. पण त्याचे दृश्य स्वरूप पाहून आपल्याला त्या खोट्या किंवा फेक न्यूज वाटतात. पण यामध्ये स्थानिक पातळीवरील गैरव्यवहार हाच मुख्य बिंदू असतो.
Table of contents [Show]
e-Gram Swaraj काय आहे?
तुम्हालाही तुमच्या गावाबद्दल आश्चर्य वाटत असेल. सरकार एवढ्या कल्याणकारी योजना राबवत आहेत. पण त्या नेमक्या आपल्या गावात दिसत नाहीत. रस्त्यांची दुरवस्था झालेली असते. गावात घाणीचे साम्राज्य माजलेले असते. आमदार-खासदार, मंत्री सांगतात की, तुमच्या गावाला निधी दिला आहे. मंजूर केला आहे. पण सर्वसामान्यांना तो कधीच दिसत नाही. पण आता ई-ग्राम स्वराज (e-Gram Swaraj) या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, योजनेनुसार, मागील काही वर्षांत किती आणि कोणत्या कामासाठी निधी मिळाला. याची डिटेल माहिती तुम्ही पाहू शकता. केंद्र सरकारच्या पंचायती राज या विभागांतर्गत ई-ग्राम स्वराज या पोर्टलची सुरूवात करण्यात आली आहे. इथे तुम्ही स्वच्छ सर्वेक्षण रिपोर्टपासून, बँकांची कामगिरी, ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेऊ शकता.
सरपंच, ग्रामसेवकाचे नाव, मोबाईल क्रमांक मिळवा
ग्रामपंचायतीच्या प्रोफाईलमध्ये जवळपास देशभरातील 2,22,379 ग्रामपंचायतीची माहिती अपलोड केली आहे. यामध्ये तुम्ही सरपंचाच्या नाव, फोटोसह, मोबाईल क्रमांक आणि ग्रामसेवकाची माहिती पाहू शकता. तसेच जिल्हा परिषद, तुम्ही निवडून दिलेल्या सदस्यांची नावेसुद्धा इथे पाहू शकतात. महाराष्ट्र राज्याची माहिती अजून अपडेट केलेली नाही. उदाहरण म्हणून इतर राज्यांची माहिती तुम्ही इथे पाहू शकता.
स्थानिक प्रशासनाचे नियोजन जाणून घ्या!
शहरांमध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिका नागरिकांकडून टॅक्स वसूल करून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देते. तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही सरकारी यंत्रणा ही भूमिका पार पाडत असते. ग्रामपंचायतीच्या कामाबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. निधी येतो किती? कशावर खर्च होतो? बिल कितीचे मंजूर होते? हे गावकऱ्यांना कधीच कळत नाही. पण आता ई-ग्राम स्वराज (e-Gram Swaraj)वरून ग्रामपंचायतीचा लेखाजोख पाहता येतो. या साईटवरील फायनान्शिअल प्रोगेस रिपोर्टमधून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा चालू आर्थिक वर्षात केलेल्या कामांचा तपशील पाहू शकता.
सरकारी पैशांचा हिशोब सर्वसामान्यांचा अधिकार
एक गोष्ट लक्षात गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांच्या एकत्रित सह्या असल्याशिवाय ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून एक रुपयाही खर्च करता येत नाही. तसेच गावामध्ये केलेल्या खर्चाचा हिशोब मागणे हा गावकऱ्यांचा अधिकार आहे. सरकारने आता अनेक गोष्टी सोप्या करून दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ही थोडे अर्थसाक्षर व्हा! आणि सरकारी पैशांचा हिशोब प्रशासनाकडे आवर्जून मागा.
आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक 'महाMoney'
"महामनी' हे आर्थिक साक्षरतेविषयक माहिती देणारे मराठीतील एकमेव वेबपोर्टल आहे. बचत, गुंतवणूक, इन्श्युरन्स म्हणजे काय? तसेच शेअर मार्केट, म्युच्युअल, ईटीएफचे कामकाज कसे चालते, पेन्शनसाठी कोणत्या सरकारी योजना चांगल्या आहेत. अशी सर्वसामान्यांना गरजेची असलेली माहिती www.MahaMoney.com या पोर्टलमधून देत आहोत. लोकांना अर्थसाक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत.