Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL 2023 Advertisers: टेलिव्हिजन आणि डिजिटल चॅनेलवरच्या जाहिरातीत घट, तरीही कोट्यवधी रुपयांची होतेय उलाढाल

IPL 2023

IPL 2023 Advertisers: BARC च्या अहवालानुसार स्टार स्पोर्ट्सच्या टीव्ही रेटिंगमध्ये 29% वाढ नोंदवली गेली आहे. पहिल्या सामन्याच्या वेळी 140 दशलक्ष दर्शकसंख्येचा टप्पा गाठण्यात स्टार स्पोर्ट यशस्वी ठरले आहे. JioCinema या डिजिटल प्लॅटफॉर्मने 1.6 कोटी नवे ग्राहक मिळवले असून स्टार स्पोर्टने 5.6 कोटी ग्राहक मिळवले आहेत. जाहिरातीतून या Star Sports आणि JioCinema ने किती महसूल कमवला हे जाणून घ्या या लेखात

सध्या देशभरात केवळ IPL सामान्यांचीच चर्चा आहे. भारतात क्रिकेटचे चाहते किती आहेत हे काही वेगळे सांगायला नको. क्रिकेट हा आता केवळ खेळ नसून व्यवसायाचे देखील एक माध्यम बनले आहे. IPL मध्ये आपल्या उत्पादनांच्या जाहिराती देण्यास अनेक ब्रँड उत्सुक असतात. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी देखील ते तयार असतात. कोविड संसर्ग ओसरल्यानंतर पुन्हा एकदा IPL चा आस्वाद लोक घेताना दिसतायेत.

या सगळया पार्श्वभूमीवर टेलिव्हिजनला प्राधान्य न देता जाहिरातदार कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. यावर्षी IPL च्या डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार मुकेश अंबानी यांच्या जिओ सिनेमाने विकत घेतले आहे. भारतीयांना जिओ सिनेमावर मोफत IPL सामने बघण्याची सुविधा जिओने उपलब्ध करून दिली आहे.

जाहिरातींचा विचार केल्यास यांत कोट्यवधींची उलाढाल होत असते. BARC इंडियाच्या टेलिव्हिजन रेटिंगनुसार गेल्या वर्षी पहिल्या क्रिकेट सामन्यात 52 कंपन्यांनी टीव्हीवर जाहिराती देण्यास पैसे खर्च केले होते. यंदाच्या वर्षी ही संख्या केवळ 31 वर येऊन पोहोचली आहे.याचाच अर्थ असा की 40% जाहिरातदार कंपन्यांनी टेलिव्हिजनवर जाहिराती देण्यास नकार दिला आहे. मागच्या संपूर्ण सिजनमध्ये जवळपास 100 कंपन्यांनी जाहिराती दिल्या होत्या अशी माहिती देखील या अहवालात दिली गेली आहे. चालू सिजनमध्ये हा आकडा 90 च्या पुढे जाईल की नाही यावर देखील शंका उपस्थित केली जात आहे.

प्रायोजकांची संख्या कमी झाली

ज्या पद्धतीने जाहिराती देऊन कंपन्या आपल्या ब्रँडचे प्रमोशन करत असतात त्याच पद्धतीने सामन्यांचे प्रायोजक बनून देखील कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असतात. जाहिरातदार कंपन्यांच्या तुलनेत प्रायोजक कंपन्यांना जास्त वेळा स्क्रीनवर दाखवले जाते. गेल्यावर्षी IPL सामान्यांसाठी 16 कंपन्यांनी टेलिव्हिजनला पसंती दर्शवली होती. यावेळी मात्र केवळ 12 कंपन्यांनी यासाठी पैसे मोजले आहेत असे अहवालात म्हटले आहे. तसे पाहायला गेले तर रिलायंस ग्रुपशी संबंधित कंपन्या देखील IPL मध्ये जाहिराती देत होते, परंतु यंदाच्या वर्षी जिओ सिनेमाला IPL च्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार मिळाल्यामुळे रिलायंस ग्रुपशी संबंधित कंपन्या जाहिरातींच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत.

कोणत्या कंपन्यांनी टेलिव्हिजनला दिला नकार?

BARC च्या अहवालानुसार खालील कंपन्यांनी IPL दरम्यान टेलिव्हिजनवर जाहिरात देण्यास नापसंती दर्शवली आहे.  Byju's, Cred, Muthoot, Netmeds, Swiggy, Flipkart, Phone Pe, Meesho, Samsung, OnePlus, Vedantu, Spotify आणि Havells या जाहिरातदार कंपन्यांनी आपल्या जाहिराती डिजिटल माध्यमात देण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील जाहिराती कमीच!

टेलिव्हिजनवर जाहिराती कमी देण्यात आल्या असल्या तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील तसेच काहीसे चित्र पाहायला मिळते आहे.मागील वर्षी  डिस्ने+ हॉटस्टारकडे ऑनलाईन स्ट्रीमिंगचे अधिकार देण्यात आले होते. त्यावर्षी 160 जाहिरातदारांनी पहिल्या क्रिकेट सामन्यांत जाहिराती दिल्या होत्या, यावर्षी ही संख्या केवळ 50 होती. म्हणजेच डिजिटल जाहिरातींमध्ये  70% घट झाल्याचे दिसून आले आहे.

जाहिरातदार कंपन्यांचे वेगवेगळे बजेट

जाहिरात देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बजेट असते. कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता टेलिव्हिजनवर जाहिरात द्यावी की डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात द्यावी याचा निर्णय घेतला जातो. मोठे जाहिरातदार अनेकदा टेलिव्हिजनवर जाहिरात देणे पसंत करतात तर छोटे जाहिरातदार डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात देण्यास पसंती दर्शवतात.

आतापर्यंतची उलाढाल!

जाहिरातदार कंपन्यांमध्ये घट झालेली असूनसुद्धा ज्या कंपन्या जाहिरात देत आहेत त्यांचे बजेटदेखील मोठे आहे असे अहवालात म्हटले आहे. BARC च्या अहवालानुसार स्टार स्पोर्ट्सच्या टीव्ही रेटिंगमध्ये 29% वाढ नोंदवली गेली आहे. पहिल्या सामन्याच्या वेळी 140 दशलक्ष दर्शकसंख्येचा टप्पा गाठण्यात स्टार स्पोर्ट यशस्वी ठरले आहे. JioCinema या डिजिटल प्लॅटफॉर्मने 1.6 कोटी नवे ग्राहक मिळवले असून स्टार स्पोर्टने 5.6 कोटी ग्राहक मिळवले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार IPL 2023 च्या सुरुवातीलाच स्टार स्पोर्ट्सने जाहिरात महसुलातून 2200 कोटी तर जिओ सिनेमाने 1400 कोटी कमवले आहेत.

 (Source: https://rb.gy/s9xc9)