वाहन विमा तुम्ही काढत असाल आणि मगच गाडी चालवत असाल तर उत्तमच! तुम्हांला घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र देशभरात असे अनेक लोक आहेत जे वाहन विमा नसतानाही गाड्या चालवत आहेत. तुमच्याकडे देखील गाडी असेल (दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक इत्यादी) आणि तुम्ही त्याचा विमा उतरवला नसेल तर तुमच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या वाहतूक विभागाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांचा वाहन विमा नसेल अशा गाड्यांच्या मालकांना लवकरच नोटीस जारी केली जाणार आहे. खरे तर मोटार वाहन कायद्याने विमा नसताना वाहन चालवणे गुन्हा आहे. वाहन विमा नसलेल्या वाहन चालक-मालकांकडून दंडवसुली देखील केली जाणार आहे.
विमा नियामक IRDA कारवाईच्या तयारीत
याच मोहिमेचा भाग म्हणून देशभरात किती वाहन विना विमा चालवले जात आहेत याचा अंदाज घेण्यासाठी विमा नियामक IRDA ने पुढाकार घेतला आहे. राज्यात कार्यरत असलेल्या विमा कंपन्या त्यांच्याकडील डेटा वाहतूक विभागासोबत शेयर करणार आहे.
या कामात सुसूत्रता यावी यासाठी विमा नियामक IRDA ने प्रत्येक राज्यासाठी एका विमा कंपनीला जबाबदारी दिली आहे. सदर विमा कंपनी इतर विमा कंपन्यांशी संपर्क करून वाहन विमा असलेल्या गाड्यांची माहिती वाहतूक विभागाला सादर करेल.
वाहन कायद्यानुसार विना विमा वाहन चालवल्यास गाडी चालकाला 2000 रुपयांचा दंड किंवा 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दोन्ही असा दंड दिला जावू शकतो. सलग दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन चालकाला 4000 रुपयांपर्यंतचा दंड आणि कारवास किवा दोन्ही अशी शिक्षा दिली जावू शकते.
50 टक्के वाहनांचा विमाच नाही!
सरकारी आकडेवारीनुसार 30.5 कोटी वाहने रस्त्यावर धावतात आणि यापैकी 16.5 कोटी वाहनांचा विमा उतरलेलाच नाहीये.म्हणजेच देशभरात जवळपास पन्नास टक्के वाहने विना विमा वापरली जात आहेत. कायद्याने वाहन विमा हा अनिवार्य आहे. सरकार वेळोवेळी याबाबत जनजागृती करत असते. असे असूनही जवळपास 50 टक्क्यांहून अधिक वाहनांचा विमा उतरवला गेलेला नाहीये.
जुन्या वाहनांचे रेकॉर्ड मिळेल
नुकतेच केंद्र सरकारने 15 वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. विमा कंपन्यांच्या डेटामधून सध्या देशभरात धावणाऱ्या वाहनांच्या वयाचा अंदाज देखील सरकारला लावता येईल आणि त्यासंबधीची धोरणे आखता येतील.