आरोग्य विमा, जीवन विमा, गुंतवणूक पॉलिसींसह विविध प्रकारच्या हजारो योजना बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडून ग्राहकांसाठी सुरू करण्यात येतात. आपल्याच योजनांना जास्त ग्राहक मिळावेत आणि व्यवसाय वाढावा यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करत असते. मग यातूनच स्पर्धेत पुढे राहण्यासाठी अॅग्रेसिव्ह मार्केटिंगला प्राधान्य दिले जाते. त्यानंतरही ग्राहक मिळत नसल्याने काही संस्था ग्राहकांची दिशाभूल करून, खोटी माहिती देऊन योजना गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. ग्राहकांनाही सविस्तर माहिती नसल्याने त्या कंपन्यांच्या खोट्या माहितीला बळी पडतात. ग्राहकांना फसवल्याच्या तक्रारी थेट अर्थमंत्रालयापर्यंत पोहचल्याने आता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सरकारी बँकांनाच सुनावले आहे. ग्राहक मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा आणि फसवणूक करू नका, असे त्यांनी बँकांना सांगितले आहे.
2021-22 वर्षात भारतीय विमा नियामक अथॉरिटीकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढले आहे. 2020-21 मध्ये 24 टक्के तक्रारी आल्या होत्या. मात्र, 2021-22 मध्ये त्यात वाढ होऊन 27 टक्के झाल्या आहेत. निर्मला सितारामन यांनी सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांना फसवणुकीच्या प्रकरणांवरुन निर्देश दिले. विमा पॉलिसी ग्राहकांना विकताना कोणत्याही प्रकारच्या गैर मार्गाचा वापर होणार नाही. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी कठोर नियमावली बनवावी, असे त्यांनी सांगितले.
अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस या विभागाकडे विमा योजना विकताना बँका आणि विमा कंपन्यांकडून गैरमार्गाचा वापर करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. त्यामुळे अर्थमंत्रालयाने सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांना पत्र लिहून याबाबत निर्देश दिले.
75 वर्षांपुढील ग्राहकाला जीवन विमा दिला -
काही प्रकरणांमध्ये 75 वर्षांपुढील ग्राहकांना जीवन विमा पॉलिसी विकण्याचा प्रयत्न बँकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारच्या घटना टियर- 2 आणि छोट्या शहरांमध्ये घडल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. पॉलिसी विक्री करण्याचा आणि टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव बँकांवर असल्याने त्यांच्याकडून ग्राहकांना काहीही करुन योजना माथी मारल्या जातात. ग्राहकांची पात्रता, वय, विविध प्रकारची माहिती नीट पडताळून न पाहता पॉलिसी खासगी बँका, सरकारी बँका आणि विमा कंपन्यांकडून करण्यात येते.
फसवणुकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी काय कराल?
बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी गेले असता बँकेची विविध विमा, गुंतवणूक योजना ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न केला जातो.
कोणतीही योजना बँकेतील कर्मचाऱ्यांनी समजून सांगितली तरी लगेच ती योजना घेऊ नका.
घरी येऊन त्या योजनेची सविस्तर माहिती मिळवा. इतर बँकेच्या योजनांशी तुलना करून पाहा किंवा अधिकृत एजंटकडूनच माहिती घ्या. त्यानंतर निर्णय घ्या.
योजनेच्या अटी, नियम बारकाईने पाहून घ्या. तुम्हाला त्या योजनेची खरच गरज आहे का ते पाहून मगच योजना घ्या. अन्यथा स्पष्टपणे योजनेची गरज नाही म्हणून नकार द्या.
बँक कर्मचाऱ्यांनी योजनेच्या फायद्यांबाबत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका.