भटक्यांची पंढरी म्हणून मढी हे गाव ओळखलं जातं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी हे एक छोटंसं गाव. नाथ संप्रदायातल्या कानिफनाथ महाराजांची येथे संजीवन समाधी आहे. दरवर्षी रंगपंचमीला मढीची जत्रा भरते. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक,तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश भागातल्या भटक्या-विमुक्त जाती या जत्रेला येत असतात. या जत्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा गाढवांचा बाजार!
महाराष्ट्रात 3-4 ठिकाणी दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. पौष पौर्णिमेला जेजुरीत भरणारा बाजार आणि रंगपंचमीला मढीत भरणारा गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे.
Table of contents [Show]
गाठीभेटीची हक्काची जागा
महाराष्ट्रातील अठरापगड जातीचे लोक या जत्रेला येतात. आजही अनेक भटक्या विमुक्त जाती कुठल्या एका गावात स्थायिक नाहीत. मिळेल तिथे कामासाठी आपलं बिऱ्हाड घेऊन ही मंडळी गावोगावी जात असतात. वर्षातून एकदा सगळ्यांच्या गाठीभेटीचं ठिकाण म्हणजे मढी. वर्षातून एकदा आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना भेटण्याची संधी या यात्रेनिमित्त लोकांना मिळत असते.
याच यात्रेत लग्नासाठी सोयरीक देखील बघितली जाते. वयात आलेल्या मुला-मुलींना विवाहासाठी स्थळ येथे शोधली जातात.
गाढवांचा प्रसिद्ध बाजार
अठरापगड जातीतल्या बेलदार, कैकाडी आणि वडार या जाती प्रामुख्याने गाढवांचा वापर करतात. त्यांच्या परंपरागत कामासाठी त्यांना गाढवांची आवश्यकता असते.
बेलदार समुदाय मुरूम, वाळू, माती वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करतात. ज्या भागात ट्रक, रिक्षा, मालगाडी जाऊ शकत नाही अशा गल्लीबोळात सहजपणे गाढवांचा वापर माल वाहून नेण्यासाठी केला जातो.
कैकाडी समाज हा हाताने विणलेली टोपली, डालगं, झाप बनवतो. सध्याच्या काळात फुलांची परडी, भाजीपाल्यासाठी टोपली तसेच सामान वाहून नेण्यासाठी मोठ्या टोपल्या विणण्याचे काम हा समुदाय करतो. बाजारापर्यंत आपला माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो.
वडार समुदाय हा परंपरागत गाढवांचा वापर करतो. दगडफोडीच्या कामासाठी, खड्डे खोदण्याच्या कामासाठी, माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. परंतु बेलदार आणि कैकाडी समुदायाच्या तुलनेत वडार समुदाय प्रगत झाला आहे. आता ट्रक, टेम्पो आल्यामुळे गाढवांची मागणी या समुदायाकडून कमी होते आहे.
पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के सांगतात की, गाढवांचा खर्च अत्यल्प असतो. त्यांना 'मेंटेनन्स'ची गरज नसते. गाईगुरांना जशी चाऱ्याची आवश्यकता असते तशी गाढवांना नसते. माळरानावर गाढवांना सोडून दिलं की पोट भरल्यानंतर ते परत माघारी येत असतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
काठियावाडी जातीची गाढवं या जत्रेत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. याचं मुख्य कारण म्हणजे ही गाढवं उंचापुरी आणि कामाला 'वाघ' असतात, म्हणजेच त्यांची काम करण्याची क्षमता अधिक असते. 30 ते 35 हजारांपर्यंत एक गाढव विकले जाते असे सोनटक्के सांगतात. तुलनेने गावठी गाढवांना कमी भाव असतो. कारण ही गाढवे उंचीला कमी असतात आणि त्यांची काम करण्याची क्षमता देखील कमी असते.
गाढवांचे दात मोजून त्यांची किंमत ठरते. ज्या गाढवाला 2 दात असतील त्याचा भाव अधिक असतो. कारण दोन दातांचा गाढव वयाने लहान असतो. त्याची काम करण्याची क्षमता देखील जास्त असते. 4 किंवा 6 दात असलेले गाढव प्रौढ किंवा म्हातारे मानले जातात. त्यांच्याकडून फार काम करून घेता येऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आणि भाव देखील कमी असतो. अशी गाढवे 10-12 हजारांपर्यंत विक्रीला असतात.
यावर्षी पाहिल्यांदाच पंजाबी गाढवं जत्रेत विक्रीला आली होती. काठीयावाडी गाढवांपेक्षा अधिक भाव पंजाबी गाढवांना मिळाला. एका गाढवाला एक लाख रुपये भाव मिळाला. तीन गाढवं पावणेतीन लाखांना विकली गेल्याचे वृत्त आहे.
यात्रेतील आर्थिक उलाढाल
आपली भटके विमुक्त भावंड वर्षातून एकदाच आपल्या पाहुण्यारावळ्यांना भेटायची. आधीच्या काळी मोबाईलची सोय नव्हती. महिनोन्महिने एकमेकांना भेटण्याची सुविधा त्याकाळी नव्हती. एकमेकांना आर्थिक मदत यानिमित्ताने केली जायची. आर्थिक वसुली केली जायची. वैदू समाजाची जातपंचायत देखील येथे भरायची. परंतु जातपंचायतीमध्ये भांडण-झगडे अधिक प्रमाणात होऊ लागले, कायद्याच्या विरुद्ध निर्णय होऊ लागले तेव्हा ही प्रथा बंद पाडली गेली.
डुकराचे केस या यात्रेत मोठ्या प्रमाणात विकले जात. याचा उपयोग ब्रश बनविण्यासाठी केला जायचा. तसेच औषधासाठी मुंगसाचे केस देखील विकले जायचे. परंतु वन विभागाने कायदे कडक केल्यामुळे असे व्यापार करण्याची कायदेशीर परवानगी नाही.
बरेच लोक जत्रेसाठी 15 दिवस अगोदर येऊन राहतात. आता इथे भक्तनिवास देखील बांधले गेले आहेत. लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था आता उपलब्ध असल्याने, इथे आर्थिक उलाढाल चांगल्या प्रमाणात होत आहे. ज्याप्रमाणे जेजुरीत खोबरं-भंडारा उधळला जातो, त्याच पद्धतीने मढीच्या जत्रेत रेवड्या उधळल्या जातात. मढीची रेवडी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. रेवडी विक्रीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून हलवाई व्यापारी जत्रेसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल यानिमित्ताने होत असते.
यावर्षी जवळपास 400 टन चपटी आणि गोल प्रकारच्या रेवड्या, 200 टन गुडीशेव आणि 100 टन फरसणाची विक्री झाल्याची बातमी आहे. मढीच्या जत्रेत एका दिवसांत 50 कोटींची उलाढाल आणि गेल्या दोन दिवसांत 100 कोटींची उलाढाल झाली आहे.
कोरोनाकाळापासून बाजार मंदगतीने
लॉकडाऊन काळात बाजार बंद होता. बांधकाम क्षेत्रातील मंदीचा परिणाम गाढवांच्या बाजारावर देखील पाहायला मिळाला होता. मागच्या वर्षी तर बाजारात गाढवं आणण्यासाठी लोकांना विनंती करावी लागली होती. सरकारने चारा, पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती, परंतु नवी गाढवं न घेता आहे ती गाढवं टिकून ठेवण्याची धडपड लोक करतायेत. गुजरात, राजस्थान मधील गाढवांची आवक देखील कमी झाली आहे.
गाढवं गेली चोरीला…
राजस्थानमधील बारा बलुतेदार समुदायासाठी काम करणाऱ्या डॉ. सतपाल ख्याती यांच्याशी महामनीने संपर्क केला. राजस्थानमध्ये लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात गाढवांची चोरी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.एकट्या हनुमानगड जिल्ह्यात 500 गाढवं चोरीला गेली होती. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर देखील त्यावर कारवाई झाली नाही. कारण, कुणाची गाढवं कोणती हवं शोधण्याची प्रणाली पोलिसांकडे नव्हती.
गाढवांचे मालक म्हणत होते की आम्हांला गाढवांपुढे उभे करा आणि आमच्या आवाजाने आमची गाढवं आमच्याकडे येतील. परंतु हे करणं अगदीच अशक्य होतं. चोरांनी 200-300 किलोमीटर दूर जाऊन विकली होती, अशी पोलिसांना माहिती मिळाली. परंतु गाढवं मात्र शोधता आली नाहीत. 15 हजारांनी जरी गाढवांचा हिशोब लावला तरी जवळपास साडेसात लाखांची ही चोरी होती. गाढवांना आणि गाढवांच्या मालकांना प्रशासनाने गंभीरपणे घेतले नाही अशी तक्रार देखील डॉ. ख्याती करतात.
आधीच परिस्थितीशी झगडत असलेल्या भटक्या-विमुक्तांचं हे मोठं शोषण होतं. याचा परिणाम गाढवांच्या खरेदी विक्रीवर जाणवला आणि बहुतांश लोक मागील वर्षी यात्रेला गेली नाहीत असे डॉ. ख्याती म्हणाले.