Credit Score Inquiry: तुम्ही जेवढ्या वेळा क्रेडिट स्कोअर तपासता त्याची नोंद क्रेडिट रिपोर्टमध्ये होते. तुम्ही स्वत: क्रेडिट स्कोअर तपासू शकतात. तसेच जेव्हा तुम्ही कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही आर्थिक सेवेसाठी बँकेकडे अर्ज करता तेव्हा बँक तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करते. तुमची पत, पूर्वी केलेले व्यवहार, कर्ज याची माहिती बँकेला मिळते. स्कोअर चेक केल्यानंतर सिबील कमी होतो, असा समज अनेकांचा आहे. खरंच क्रेडिट स्कोअर कमी होतो का? ते या लेखात पाहूया.
क्रेडिट स्कोअर चेक करण्याचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. सॉफ्ट इन्क्वायरी आणि हार्ड इन्क्वायरी. यापैकी सॉफ्ट इन्क्वायरीद्वारे कितीही वेळा सिबील स्कोअर चेक केला तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येत नाही. मात्र, हार्ड इक्वायरीचा क्रेडिट स्कोअरवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
सॉफ्ट इन्क्वायरी म्हणजे काय?
1)जेव्हा तुम्ही स्वत: क्रेडिट स्कोअर/सिबील स्कोअर चेक करता.
2)तुमची कंपनी किंवा घरमालक तुमच्या परवानगीने क्रेडिट स्कोअर चेक करतो.
3) बँक स्वत:हून तुमचा स्कोअर चेक करून तुम्हाला कर्जाची ऑफर देते.
वरील तीनही परिस्थितीत तुमचा क्रेडिट स्कोअर कितीही वेळा चेक केला तरी तो खाली येत नाही. त्यामुळे काहीही काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा गृहकर्ज, वाहनकर्ज, क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करत असाल त्याआधी कितीही वेळा स्कोअर चेक करू शकता.
हार्ड इन्क्वायरी म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता त्या वेळेस तात्पुरत्या काळासाठी तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. बँकेकडे अर्ज केल्यानंतर तुमचा स्कोअर चेक केला जातो, त्यास हार्ड इन्क्वायरी असे म्हणतात. खाली आलेला स्कोअर काही दिवसांनी पुन्हा वर जातो.
जर तुम्ही सतत लोन आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तर स्कोअर खाली राहू शकतो. कारण तुम्ही क्रेडिटवर खूप अवलंबून आहात असे बँक समजते. तसेच 'जोखमीचा कर्जदार' (रिस्क बॉरोअर) अशी तुमची गणना होऊ शकते.
क्रेडिट स्कोअर खाली येण्याची इतर कारणे कोणती?
क्रेडिट स्कोअर खाली येण्यास इतरही कारणे आहेत. जसे की, तुमचे आधीचे व्यवहार, क्रेडिट वापराचे प्रमाण, क्रेडिट कालावधी, विविध प्रकारचे कर्ज किती आहेत, इएमआय थकवले आहेत का? यावरही स्कोअर अवलंबून असतो.