Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रुपयाच्या चलनाची ही कथा तुम्हाला माहिती आहे का?

रुपयाच्या चलनाची ही कथा तुम्हाला माहिती आहे का?

भारताला नाण्यांचा खूप मोठा इतिहास आहे. गेल्या हजार वर्षांतली वेगवेगळी नाणी भारतातल्या अनेक म्युझियममध्ये आजही जतन केली आहेत.

भारतात रुपया माहित नाही असे कोणीच नाही. अगदी नुकत्याच शाळेत जाणाऱ्या मुलालासुद्धा रुपया माहीत आहे. मात्र रुपया या नावात तसेच तो देशभरात एकसमान चलन (currency) म्हणून वापरला जाण्यामागे मोठा इतिहास आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतातील नाण्याचा इतिहास 

भारतात ऐतिहासिक काळापासून व्यवहारात नाणी (coins) वापरतात. अगदी चाणक्याच्या काळातही नाणी वापरात असल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. गेल्या हजार वर्षांतली अनेक नाणी देशात होती. ती वेगवेगळ्या म्युझियममध्ये आजही जतन केली आहेत. नाणशास्त्र (Numismatics) विषयातले तज्ज्ञ अशा नाण्यांचा अभ्यास करत असतात. या नाणे अभ्यासकांची संख्या भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. नाण्यांसाठी प्रामुख्याने धातूचा (metals) वापर केला जातो. भारतात मध्ययुगीन काळात शेर शाह सूरीने दिल्लीवर अल्पकाळ राज्य केलं. त्या काळात रुपिया नावाने चांदीचे नाणे चलनात आणण्यात आलं होतं. ही रुपया नावाची सुरुवात होती, असं म्हटलं जातं. मुघलांच्या राज्यात त्या सोबतच सोन्याची मोहोर आणि तांब्याचे दाम ही नाणीदेखील प्रचलित होती. सोन्याची नाणी देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचलित होती, असं आपल्याला दिसेल.

भारतातील इंग्रजांच्या काळातील नाणी 

भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू झाल्याच्या काळात राजे आणि त्यांच्या राज्यांची संख्या खूप होती. त्यांच्या वेगवेगळ्या नाण्यांची संख्याही खूप होती. त्याचा विनिमय दर (Exchange rate) परस्पर संमतीने वेळोवेळी निश्चित केला जात असे. 1760 मध्ये भारतात 900 वर नाण्यांचे प्रकार चलनात होते, असं नोंदवण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये धातू, वजन आदींत एकसमानता असणं कठीण होतं. त्यामुळे नाण्यांचे खरे मूल्य निश्चित करण्यासाठी त्यात तज्ज्ञ असलेल्या मंडळींची मदत घेणं आवश्यक व्हायचं. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपलं जाळं पक्कं करायला सुरूवात केल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांत नाणं पाडण्यासाठी स्वतःच्या टांकसाळ सुरू केल्या. तोवर नाण्यांमध्ये सोने आणि चांदी यांचीच नाणी प्रामुख्याने वापरली जात होती. असं असलं तरी त्याकाळी तांबे आणि इतर धातूंची नाणीही मोठ्या प्रमाणात होती. मात्र देशभराचा विचार केला तर त्यात एकसारखेपणा नव्हता. ब्रिटीशांनी 1835 साली कायदा करून चेन्नई (त्यावेळचे मद्रास) येथे चलनात असलेला चांदीचा रुपया हेच चलन म्हणून देशभर वापरायला सुरूवात केली. तेंव्हापासून म्हणजे गेली 185 वर्षांहून अधिक काळ रुपया हे देशभरात एकसमान चलन बनलं, त्यात व्यवहार सुरू झाले. सोन्याच्या मोहरा व्यवहारातून बाद करण्यात आल्या.

भारतातील रुपयाचा प्रवास 

ब्रिटीश काळात रुपया आणि त्याचा भाग म्हणून आणे (Anna) हीच चलनव्यवस्था होती. साहजिकच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही रुपया हे चलन कायम राहिलं. 16 आण्यांचा एक रुपया होता. पुढे चलनासंबंधातला नवा कायदा 1 एप्रिल 1957 पासून अंमलात आला. भारताने मापनासाठी दशमान पद्धती (Decimal system) स्वीकारली होती. त्यामुळे नव्या कायद्यानुसार एक रुपयाची विभागणी 100 भागांत करण्यात आली. एक रुपया म्हणजे 100 पैसे हे सूत्र आजही कायम आहे. आणे हे व्यवहारातून अधिकृतपणे बाद झालं. भारतात चलन व्यवस्थेसंदर्भातील निर्णय प्रामुख्याने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) ही मध्यवर्ती बॅंक (Central bank) घेते. देशभरातल्या बॅंकांच्या नेटवर्कमार्फत नव्या नोटांच्या  सिरीज (series) आणि नाणी बाजारात (circulation) आणली जातात किंवा circulation मधून काढूनही घेतली जातात.

भारताचे ₹ रुपयाचं चिन्ह

रुपया या चलनाच्या वापराला मोठा इतिहास असला तरी लिहिताना रुपयाचा उल्लेख संक्षिप्त स्वरुपात Re (एकवचनी) किंवा Rs (अनेकवचनी) असाच होत होता. जगातील इतर प्रमुख देशांचे चलन असलेल्या डॉलर, पौंड, येन इत्यादी चलनांसाठी त्यांची विशिष्ट चिन्हे वापरात आहेत. मात्र रुपया दर्शविण्यासाठी त्याचे स्वतःचे स्वतंत्र चिन्ह नव्हते. 15 जुलै 2010 ला भारताने रुपयाचं अधिकृत चिन्ह स्वीकारलं आणि वापरासाठी खुलं केलं. देवनागरी लिपीतील र आणि इंग्रजीतील आर (R) या अक्षरांशी साधर्म्य दाखवणारं हे चिन्हाचं डिझाईन आहे. लिखित स्वरूपात रुपयासाठी आता ₹ हे चिन्ह सर्वत्र वापरलं जाण्यास सुरुवात झाली आहे. टंकलेखनातही ही सुविधा आहे.

आपण आपल्या आजी - पणजी कडून नेहमी ऐकले असेल 10 आण्यात एवढं सामान आणायचो. पण आता हि आणि इतिहासजमा झाली आहेत. याच नाण्याच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.