Post Office Whole Life Assurance: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसद्वारे चालविल्या जाणाऱ्या बचत योजना आज देखील आपल्यापैकी मध्यमवर्गीय घरांमधील चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. पोस्टातर्फे बचत खात्यातून आरडी अर्थात Recurring Deposits आणि एफडी म्हणजे Fixed Deposit सारख्या खात्यांमध्ये विश्वासाने वर्षांनुवर्षे ठेवी ठेऊन स्वतःच्याच काय, पण मुलांच्या संसाराला देखील हातभार लावणारे ज्येष्ठ नागरिक आपल्या आसपास वावरताना आपण पाहतो. याच पोस्टाची आयुर्विम्याची सुविधा पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Postal Life Insurance-PLI) म्हणून ओळखली जाते.
PLI म्हणजेच पोस्टल लाईफअॅश्युरन्स ही सर्वात जुनी सरकारी विमा योजना आहे; जिची सुरुवात ब्रिटीश सरकारच्या काळात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाली. आजच्या काळातील स्मार्ट आणि फ्लॅशी भासणाऱ्या इन्शुरन्स ऑन क्लिकच्या ऑनलाईन युगात थोड्या पारंपरिक-घरगुती वाटाव्या, अशा पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेअंतर्गत सुरक्षा, सुविधा, संतोष, युगल सुरक्षा, सुमंगल आणि बालजीवन विमा अशा 6 योजना चालवल्या जातात. त्यापैकी आज आपण व्होल लाईफ अॅश्युरन्स (Whole Life Assurance) म्हणजेच सुरक्षा पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत.
सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये (Features of Life Assurance)
वर्ष 2017 पर्यंत पोस्टल लाईफअॅश्युरन्स योजनेचा लाभ फक्त सरकारी आणि निम-सरकारी कर्मचाऱ्यांनाच घेत येत होता. मात्र 2017 नंतर, केंद्र आणि राज्य सरकार, संरक्षण आणि निमलष्करी सेवा यांच्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Public Sector Undertaking), बँका, शैक्षणिक संस्था, स्थानिक संस्था, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)/बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील कर्मचारी, इतकेच नव्हे तर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, चार्टर्ड अकाउंटंटस्, ॲड्व्होकेटस्, मेडिकल कन्स्लटंटन्ट्स, आर्किटेक्ट्स, एमबीए यांच्यासारख्या व्यावसायिकांना आणि कर्मचाऱ्यांना देखील या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी समाविष्ट करण्यात आले.
व्होल लाईफ अॅश्युरन्स ही पॉलिसी खरेदी करण्याची वयोमर्यादा 19 ते 55 वर्षे निश्चित केली आहे. तर प्रीमियम भरण्याचे वय 55, 58 किंवा 60 वर्षे म्हणून निवडले जाऊ शकते. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी सर्व पॉलिसी खरेदीदारांना वैद्यकीय तपासणी करावी लागते.
या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला 80 वर्षापर्यंत किमान 20,000 रुपये आणि कमाल 50 लाख रुपये किमतीची (Sum Assured) इन्शुरन्स पॉलिसी मिळते. वयाची 80 वर्षे पूर्ण करणाऱ्या पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बेनिफिट्स दिले जातात. 80 वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला/नॉमिनीला डेथ-बेनिफिट्सची रक्कम जमा झालेल्या बोनसच्या समावेशासह दिली जाते.
या योजनेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, भरावा लागणारा अत्यल्प प्रिमिअम. उदाहरण द्यायचे झाले तर, पॉलिसीधारक 20 वर्षांचा असेल आणि त्याने व्होल लाईफ अॅश्युरन्स पॉलिसी खरेदी केली असेल आणि त्याने वयाच्या 60 व्या वर्षी पॉलिसी मॅच्युअर्ड करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला पुढील 40 वर्षांसाठी सुमारे 1500 रुपये / प्रतिमहिना प्रीमियम भरावा लागेल. म्हणजे दैनंदिन प्रीमियम सुमारे 50 रुपये असेल.
या विमा पॉलिसीत, पॉलिसीची 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिसीधारक ही इन्शुरन्स पॉलिसी 3 वर्षांनंतर सरेंडर देखील करू शकतो. परंतु पॉलिसी घेतल्यापासून 5 वर्षापूर्वी पॉलिसीचे समर्पण (सरेंडर) केले असेल, तर पॉलिसीधारक बोनस मिळण्यास पात्र असणार नाही. बोनसची रक्कम मिळण्यासाठी पॉलिसीची 5 वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी पॉलिसी समर्पण केल्यास कमी विमा रकमेवर आनुपातिक बोनस (Proportional Bonus) दिला जातो.
पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये भरलेल्या प्रीमियमसाठी पॉलिसीधारकाला इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर भरण्यापासून सूट मिळू शकते. या योजनेत प्रीमियम भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असे एकापेक्षा अनेक पर्याय दिले जातात, ज्यापैकी पॉलिसीधारक त्याच्या सोयीनुसार प्रिमिअमचा भरणा करण्याचा पर्याय निवडू शकतो.
पोस्ट ऑफिसाद्वारे शेवटचा घोषित बोनस 76/- प्रति 1000 रुपये प्रति वर्ष आहे. म्हणजेच समजा, एखाद्या पॉलिसीधारकाने 10,00,000 (10 लाख रुपये) विमा रक्कमेची (Sum Assured) पॉलिसी खरेदी केल्यास, त्याला वार्षिक बोनस 76,000 रुपये असेल. पुढील 40 वर्षांसाठी समान प्रमाणात बोनस मिळाल्यास, बोनसची एकूण रक्कम 30,40,000/- रुपये होईल. म्हणजेच मॅच्युरिटी अमाऊंट 40,40,000/- रुपये असेल, ज्यामध्ये 10 लाख रुपयांची विमा रक्कम समाविष्ट केली जाईल.