घोटाळा कोणता ही असो, त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम पडतो. कित्येक दिवस अर्थव्यवस्थेला त्यातून उभारायला लागतात. मात्र, यातून भारतीयांची सुटका नाहीच. ते प्रत्येक क्षेत्रात पसरले असून उघडकीस आल्यावरच त्याविषयी सामान्यांना माहिती होते. असेच काही मोठे घोटाळे उघडकीस आले होते, त्यामुळे भारतीयांना नाहक त्रासाला सामोर जावे लागले होते. आज आपण त्या घोटाळ्यांविषयी जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
2G स्पेक्ट्रम घोटाळा
या घोटाळ्याने डायरेक्ट सरकारी तिजोरिला 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान केले होते. त्यामुळे या 2G स्पेक्ट्रम स्कॅमला सर्व घोटाळ्यांची जननी म्हटल्या जाते. या घोटाळ्याच्या तपासात दूरसंचार मंत्रालयातून 2008 ला कमी किमतीत वायरलेस रेडिओ स्पेक्ट्रम आणि परवाने खासगी ऑपरेटर्सना अत्यंत कमी किमतीत देण्यात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे दूरसंचार मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ आली होती. तसेच, या घटनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला होता.
तेलगी घोटाळा
तेलगी घोटाळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी हे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे. 2003 ला बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे भारतातील राजकीय आणि नोकरशाही क्षेत्रातील भ्रष्टाचार पाहायला मिळाला. हा घोटाळा एका नाहीतर बारा राज्यात करण्यात आला होता. तसेच, या घोटाळ्याची रक्कम 20 हजार कोटींहून अधिक असल्याचे आजही बोलले जाते. या स्कॅमद्वारे मोठ्या प्रमाणात बनावट स्टॅम्प पेपर्सचे उत्पादन करून ते मोठ्या संस्थांना कमी किमतीत विकल्या गेले होते. हा घोटाळा 1992 पासून 2003 पर्यंत सुरू होता. त्याहून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते.
कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा
2010 साली भारतात पार पडलेली कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा एका वेगळ्या गोष्टीसाठी आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रातही घोटाळा होऊ शकतो. हे भारतीयांच्या निदर्शनास आले. या स्पर्धेद्वारे अंदाजे 35,000 कोटींपर्यंत घोटाळा केला असल्याचे उघडकीस आले होते. त्यामध्ये बनावट संस्थाना पेमेंट करणे, करारांना उशीर करणे, पैशांचा गैरवापर अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.
सत्यम घोटाळा
भारतीय कॉर्पोरेट विश्वातील सर्वात मोठा घोटाळा म्हटल्यावर सत्यम घोटाळा डोळ्यांसमोर येतो. हा घोटाळा 2009 साली उजेडात आला. यामध्ये सत्यम काॅम्प्यूटरचे अध्यक्ष यांनी कंपनीच्या आर्थिक रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचा आणि कंपनीच्या महसूल आणि नफ्याचे आकडे वाढवल्याचा आरोप होता. अंदाजे 14,000 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली होती. अध्यक्ष्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांच्या कंपनीचे भांडवल एका दिवसात 10,000 कोटी ने घसरले होते.
हर्षद मेहता घोटाळा
शेअर मार्केटमध्ये द बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहताने 1992 ला केलेल्या घोटाळ्यामुळे त्यांचे नाव भारतभर गाजले होते. हर्षद मेहताने अंदाजे 5,000 कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. त्यांनी बँकिंगमधील त्रुटींचा गैरफायदा घेत मुंबई शेअर मार्केटमध्ये अनेक विभागांमध्ये प्रीमियमवर शेअर्सचा व्यवहार करून तेजी आणली होती. तसेच, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बँकांचा पैसा शेअर ब्रोकरकडे वळवला होता, ज्यामुळे सत्तरहून अधिक फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            