केंद्रीय कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून 'कर्मचारी राज्य विमा योजना' (ESIC) सुरु केली आहे. या योजनेचे उद्घाटन 24 फेब्रुवारी 1952 रोजी कानपूर येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या हस्ते करण्यात आले. ज्या अंतर्गत कमी पगार मिळणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला जातो.
खाजगी नोकरदारवर्ग, कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा कामगार या योजनेत समाविष्ट असतात. ड्युटीवर असताना एखादा कर्मचारी अपघाताला बळी पडला, तर त्याला ईएसआयसी (ESIC) योजनेंतर्गत उपचाराची सुविधा दिली जाते. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय सेवा दिली जाते. या योजनेचे फायदे काय आहेत, यासाठी कोण पात्र असेल, त्याची नोंदणी कुठे केली जाते अशी सर्व माहिती जाणून घ्या.
Table of contents [Show]
ESIC योजनेत मिळणारे 10 फायदे
या योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाभार्थ्यांना 10 प्रकारचे लाभ दिले जातात. ते पुढीलप्रमाणे...
वैद्यकीय लाभ: ESIC मध्ये विमाधारक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ दिला जातो. वैद्यकीय सुविधा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांला या विम्या अंतर्गत दवाखान्यांमध्ये किंवा पॅनेल क्लिनिकद्वारे प्राथमिक, बहिरंग, अंतरंग आणि विशेष सेवा पुरवल्या जातात. तर सुपर स्पेशालिटी सेवा या रेफरल (Referral) आधारावर देशातील नामांकित वैद्यकीय संस्थांमार्फत प्रदान केल्या जातात.
आजारपणात घेता येतो लाभ: वर्षातील जास्तीत जास्त 91 दिवस प्रमाणित आजारपणाच्या कालावधीत विमाधारक कर्मचाऱ्याला वेतनाच्या 70 टक्के दराने रोख भरपाईच्या स्वरूपात रक्कम दिली जाते. आजारपणातील लाभाकरिता पात्र होण्यासाठी विमाधारक व्यक्तीने 6 महिन्यांचा काँट्रीब्युशन कालावधीत 78 दिवसांचे काँट्रीब्युशन देणे आवश्यक आहे.
मातृत्व लाभ: ESIC प्रसूती रजेदरम्यान, प्रसूतीच्या बाबतीत 26 आठवड्यांपर्यंत, गर्भपात झाल्यास 6 आठवड्यांपर्यंत, दत्तक मुल घेतलेल्या आईसाठी 12 आठवड्यांपर्यंत सरासरी दैनंदिन वेतनाच्या 100 टक्के रक्कम रोख स्वरूपात दिली जाते.
अपंगत्व लाभ: तात्पुरत्या अपंगत्वाच्या बाबतीत आणि कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत, आयुष्यभरासाठी दुखापत बरी होईपर्यंत ESIC विमाधारक व्यक्तीला मासिक पेन्शन देण्यात येते.
अवलंबित लाभ: जर एखाद्या विमाधारक व्यक्तीचा नोकरीत असताना मृत्यू झाला, तर ESIC त्याच्या अवलंबितांना निश्चित स्वरूपाची मासिक पेन्शन देते. हा लाभ विमाधारकाच्या मृत्यूनंतर जास्तीत जास्त ३ महिन्यांच्या कालावधीत विमाधारकाच्या अवलंबितांना दिला जातो आणि त्यानंतर नियमितपणे मासिक आधारावर देण्यात येतो. ही पेन्शन 3 भागांमध्ये विभागली जाते. पहिल्यांदा विमाधारकाच्या पत्नीला पेन्शन मिळते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विमाधारकाच्या मुलांना आणि तिसऱ्या टप्प्यात विमाधारकाच्या पालकांना ही रक्कम देण्यात येते.
बेरोजगारी भत्ता: जर एखादी विमाधारक व्यक्ती अनैच्छिक नुकसानीमुळे किंवा नोकरीत उद्भवलेल्या दुखापतीमुळे कायमची अक्षम (Disable) झाली, तर त्या व्यक्तीला 24 महिन्यांच्या कालावधीसाठी रोख मासिक भत्ता मिळतो.
वृद्धापकाळात वैद्यकीय लाभ: सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त झालेल्या विमाधारक व्यक्तीलाही वैद्यकीय सेवेचा लाभ ईएसआयसी (ESIC) रुग्णालयांमध्ये घेता येतो.
शारीरिक पुनर्वसन: कामकाजाच्या ठिकाणी जर व्यक्तीला दुखापत झाली आणि त्यामुळे शारीरिक अपंगत्व आल्यास, विमाधारक व्यक्तीला कृत्रिम अवयव केंद्रात दाखल करेपर्यंत तात्पुरता अपंगत्व लाभाची सुविधा देण्यात येते.
प्रसूती खर्च: ज्या प्रकरणांमध्ये गरोदर महिलांना ईएसआयसी (ESIC) रुग्णालयांमध्ये वैद्यकीय लाभ मिळत नाहीत, अशा महिलांना बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी 7500 रुपये रोख रक्कम वैद्यकीय खर्चासाठी दिली जाते. हा लाभ फक्त दोनदा दिला जातो.
अंत्यसंस्काराचा खर्च: ESIC च्या वतीने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी येणार मूळ खर्च किंवा कमाल 15,000 रुपये रोख स्वरूपात दिले जातात.
ESIC साठी कोण पात्र असेल?
ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्याहून कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना ईएसआयसीचा (ESIC) लाभ घेता येतो. ही वेतन मर्यादा 1 जानेवारी 2017 पासून लागू करण्यात आली आहे. तथापि, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी ईएसआयसीचा (ESIC)लाभ मिळविण्यासाठी किमान वेतन मर्यादा 25,000 रुपये महिना ठेवण्यात आली आहे. अपंग कर्मचाऱ्यांच्या कव्हरेजसाठी कमाल वेतन मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
ESIC योजनेशी संबंधित FAQ नुसार, जर कर्मचार्याचा पगार काँट्रीब्युशन कालावधी सुरू झाल्यानंतरही प्रति महिना 21,000 रुपयांची कमाल मर्यादा ओलांडत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तो योगदान कालावधी संपेपर्यंत त्याला ESIC अंतर्गत लाभ घेता येतो. या प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून ठराविक रक्कम काँट्रीब्युशन स्वरूपात कापली जाते.
ESIC योजनेत काँट्रीब्युशन कसे केले जाते?
कर्मचारी आणि कंपनी दोघेही ईएसआयसीमध्ये (ESIC) काँट्रीब्युशन करतात. सध्या कर्मचार्यांच्या पगारातून 1.75 टक्के काँट्रीब्युशन ESIC मध्ये दिले जाते. तर 4.75 टक्के काँट्रीब्युशन कंपनी स्वतःच्या बाजूने करते. ज्या कर्मचाऱ्यांचा दिवसाचा पगार 137 रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्याला काँट्रीब्युशन करण्याची गरज नाही.
ESIC योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
ESIC योजनेसाठी नोंदणी कंपनीच्या वतीने केली जाते. यासाठी कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागते. याशिवाय नॉमिनी (Nominee) देखील ठरवावा लागतो.
ESIC कार्ड कसे डाउनलोड करावे?
- युजर आयडी (User ID) आणि पासवर्डचा वापर करून http://www.esic.in या वेबसाईटवर लॉग इन करा
- पुढील पेजवर गेल्यांनतर E-pehchan Card लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा
- यानंतर कर्मचारी त्याचे नाव लिस्टमध्ये शोधू शकतो किंवा मुख्य युनिटमधील कर्मचाऱ्यांची यादी तपासू शकतो
- कर्मचाऱ्याला नाव सापडल्यानंतर नावासमोर दिसणार्या View Counter Foil या पर्यायावर क्लिक करा
- क्लिक करून कर्मचारी ESIC कार्डची प्रिंट आउट सहज घेऊ शकतो