तुम्हांला ऑफिसला जायला उशीर झालेला असतो. एकदम घाईत तुम्ही घरून निघता. गाडीला किक मारता आणि सुसाट गाडी पळवता. नेमक्या अशावेळी ट्रॅफिक पोलीस तुमची गाडी अडवतो आणि तुमच्याकडे गाडीची कागदपत्रे मागू लागतो.
अगोदर गाडीचा वाहन परवाना पोलीस मागतात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही तुमचं पाकीट घरीच विसरला आहात.पोलीस पुढे RC बुक मागतात, ते देखील तुम्ही आणलेलं नसतं.
पोलिसांना समजून येतं की तुम्ही गाडीची कागदपत्रं आणलेली नाहीत. आता पोलीस तुम्हांला गाडीचा विमा, पीयूसी प्रमाणपत्र मागतात. ते देखील तुमच्याकडे नसतात. अशावेळी तुम्ही पुरते भांबावलेले असता.
वाहन कायदा 180 नुसार, कुणा दुसऱ्या व्यक्तीची गाडी विना वाहन परवाना कुणी चालवत असेल तर अशा व्यक्तीला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा 1000 रुपयांचा दंड भरावा लागतो.
सोबतच वाहन कायदा 196 नुसार विमा न उतरवलेले वाहन कुणी चालवताना आढळल्यास अशा व्यक्तीला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा 1000 रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. आता हे सगळे नियम पोलिसांनी सांगितल्यानंतर कुणाही व्यक्तीची भंबेरी उडू शकते.
Table of contents [Show]
अशा वेळी काय कराल?
तुम्ही तुमच्या गाडीची कागदपत्रे घरी विसरला असाल तर हरकत नाही. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. शक्यतो तुमची सगळी कागदपत्रे स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा डिजी लॉकरमध्ये ठेवा. तुम्ही गाडीशी संबंधित कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देखील पोलिसांना दाखवू शकता.

नियम काय सांगतो?
मोटर वाहन नियम 39 नुसार तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील. परंतु पोलिसांनी मागितले तेव्हा जर तुमच्याकडे ती उपलब्ध नसतील तर तुम्ही डिजिटल कॉपी पोलिसांना दाखवू शकता.
यातून पोलिसांचे समाधान न झाल्यास ते प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्यास तुम्हांला सांगू शकतात.
अशावेळी नियमानुसार 15 दिवसांचा अवधी सदर व्यक्तीला दिला जातो. परंतु नियमांचा भंग केला असल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचे संपूर्ण हक्क पोलीस यंत्रणेला आहेत. या बद्दल मुंबई पोलिसांनीच अलीकडे केलेलं हे ट्विट बघा,
कर्णकर्कश हॉर्न वाजवल्यास 10,000 रुपयांचा दंड!
काही वर्षांपूर्वी मोठमोठे हॉर्न दुचाकी, चारचाकी गाड्यांना लावायची स्पर्धा सुरू झाली होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. जून 2022 मध्ये आलेल्या नव्या नियमानुसार कर्णकर्कश हॉर्न लावल्यास सदर वाहन मालकाला दहा हजारांचा दंड भरावा लागू शकतो.
धोकादायक ड्रायव्हिंग!
धूम स्टाईल गाडी चालविण्याचे प्रकार टाळण्यासाठी परिवहन विभागाने नवे नियम आणले आहेत. रस्ते सुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास चालकाला 1000-5000 रुपये दंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वेगवान ड्रायव्हिंगला आळा!
ओव्हर स्पिडिंग ही देखील एक समस्या आहे. अनेकदा हे अपघाताचे मुख्य कारण राहिलेले आहे. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर गाड्यांचा वेग मोजणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हलक्या वाहनांना या नियमांचा भंग केल्यास 1000-2000 रुपये दंड तर मध्यम प्रवासी आणि मालवाहू वाहनांच्या चालकांना 2000- 40,000 रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो.
थोडक्यात काय तर, नियम न तोडणे हे कुठल्याही शहाण्या माणसाचे लक्षण आहे. नियम न तोडता जर तुम्हांला पोलिसांनी पकडले असेल तर तुम्ही त्यांच्याकडून 15 दिवसांचा वेळ मागून घेऊ शकता आणि या कालावधीत आवश्यक ती कागदपत्रे पोलिसांना सादर करू शकता. परंतु नियम तोडले असल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल हे लक्षात असू द्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            