Central Government: औद्योगिक उत्पादनाच्या टक्केवारीच्या बाबतीत वस्त्रोद्योगाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीतील योगदान गेल्या तीन वर्षांत सुमारे 7% होते, अशी माहिती राष्ट्रीय लेखा सांख्यिकीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत देण्यात दिली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रात 4.5 कोटी प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा अंदाज वर्तवण्यात आली. विणकाम आणि प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासह वस्त्रोद्योगातील रोजगार, गुंतवणूक आणि या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार विविध योजना आणि कार्यक्रम राबवत आहे. त्यात एकात्मिक प्रक्रिया विकास योजना, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम, राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम, सामर्थ-वस्त्र क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी योजना, सिल्क समग्रा 2 आणि एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यानांसाठी योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.
पी-एम मित्र योजनेचा उद्देश काय?
जागतिक स्तरावर भारतीय वस्त्रोद्योग उत्पादनांचा वाटा वाढवण्यासाठी, सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि अॅपरेल पार्क्स (पीएम- मित्र ) योजनेला 3 वर्षांच्या कालावधीत 7 मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी मान्यता दिली आहे.
कापडासाठी पीएलआय(PLI) योजना देशात उच्च मूल्याच्या मॅन मेड फायबर (MMF), आणि तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करेल. कापड उद्योगाच्या संपूर्ण मूल्य-साखळीसाठी तसेच वस्त्रोद्योगाचे उत्पादन आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एकात्मिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करणे हा पी-एम मित्र योजनेचा उद्देश आहे.