गेमिंग हा खेळ भारतात वाढतोय हे खरंच. पण, एक महत्त्वाची समस्या या उद्योगाला भेडसावत होती ती म्हणजे खेळात ओरिजिनॅलिटी म्हणजे भारतीयत्वाचा अभाव. सगळी कॅरेक्टर परदेशी होती. त्यामुळे गेमिंगचा अपेक्षित प्रसार शहरांच्या पलीकडे गावा गावात होत नव्हता.
बॅटल ग्राऊंड म्हणजे युद्धविषयक खेळातही भारतीय कॅरेक्टर कधी नव्हतं, अगदी खेळ भारतातच विकसित झालेला असला तरीही. यावर आता गेम निर्मात्यांनी लक्ष द्यायचं ठरवलंय. आणि एकखेळ बाजारात आणला आहे - सिंधू संस्कृती रॉयल्स. यात भारतीय संस्कृती आणि पुराण कथांची पार्श्वभूमी आहे.
पुण्यातील रिषी अळवणी यांनी हा गेम विकसित केला असून यातला बराचसा मजकूर त्यांनी लिहिलाही आहे. आफ्रिकन वकांडा गेम्समधून प्रेरणा घेऊन हा गेम विकसित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यात भविष्यातला भारत कसा असू शकेल असा विचार त्यांनी केला आहे. आणि भारत हा जगातील सगळ्यात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित देश असेल असं स्वप्नही रंगवलं आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला या खेळाचा टिझर लाँच झाला होता. आणि तेव्हापासून लोकांमध्ये उत्सुकता वाढल्याचं रिषी अळवणी यांनी सांगितलं. आणि सुरुवातीपासूनच खेळाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधू संस्कृतीतल्या एका भारतीय गावात हा गेम घडतो. आणि यात भरपूर साय-फाय म्हणजे विज्ञानाधारित तंत्रज्ञानविषयक घडामोडी आहेत.
हा खेळ विकसित करणारी सुपरगेमिंग ही कंपनी एक स्टार्टअप कंपनी असून यापूर्वी काही गेम्स त्यांनी यशस्वी केले आहेत. आता सिंधू रॉयाल गेमच्या टेस्टिंगसाठी कंपनीने पुणे आणि बंगळुरू इथं दोन स्टुडिओ विकसित केले आहेत. इथं लोकांना या खेळाचा आस्वाद घेता येईल. आणि त्यानंतर खेळ सर्वसामान्यांसाठी खुला होईल.
भारतातला गेमिंग उद्योग सध्या 3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका मोठा आहे. आणि यात दर महिन्याला दोन लाख नवीन लोकांची भर पडत आहे. अशा लोकांना भारतीय पार्श्वभूमीचे खेळ उपलब्ध करून देणं हे आता भारतातल्या उद्योगासमोरचं मोठं आव्हान आहे.