केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिलॉकर (Digilocker) सेवेचा वापर प्रामुख्याने महत्त्वाची कागदपत्रं डिजिटली (Digital) जतन करून ठेवण्यासाठी केला जातो. डिजिलॉकर या सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी MyGov Helpdesk तयार केला आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून MyGov Helpdesk ची मदत घेऊन काही मिनिटांत व्हॉट्सअॅपवर डिजिलॉकर (Digilocker WhatsApp) सेवा सुरू करू शकता.
MyGOV या हेल्पडेस्क अंतर्गत सरकार नागरिकांना विविध सरकारी सेवा / योजनांसाठी मदत करते. डिजिटल लॉकर (डिजिलॉकर) सुरू करण्यासाठी MyGOV हेल्पडेस्कद्वारे (+91 9013151515) हा व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आला आहे. या व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल लॉकर सुरू करू शकता. डिजिलॉकरच्या (Digilocker) माध्यमातून पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्रासह इतर महत्त्वाची कागदपत्रं सहज डाउनलोड करू शकता. डिजिलॉकर सुरु करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आधारकार्ड (Aadhar Card) असणे गरजेचे आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे डिजिलॉकर सेवा कशी सुरू करायची?
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये MyGOV या हेल्पडेस्कचा (+91 9013151515) हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करा. त्यानंतर या क्रमांकावर नमस्ते किंवा हाय (Hi) केले की, तुम्हाला डिजिलॉकर अकाउंट किंवा कोविन (COWIN) सर्व्हिस अॅक्सेस असे पर्याय समोर येतील. जर डिजिलॉकर पर्याय निवडला आणि तुमचे आधीच डिजिलॉकरला खाते असेल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि पिन क्रमांक टाकावा लागेल. मग वन टाईम पासवर्डने (OTP) तुम्ही डिजिलॉकर मधील कागदपत्रं डाउनलोड करू शकता.
व्हॉट्सअॅपवरून डिजिलॉकर खाते तयार करा
जर तुमचे डिजिलॉकर खाते नसेल तर तुम्ही तात्काळ बनवू शकता. MyGOV हेल्पडेस्कद्वारे तुमच्या व्हॉट्सअॅपवर लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आधार क्रमांक टाकून तुम्ही नवीन डिजिलॉकर खाते सुरू करू शकता.
कोणती कागदपत्रं मिळणार
• पॅन कार्ड,
• ड्रायव्हिंग लायसन्स
• वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
• दुचाकी इंश्योरेन्स पॉलिसी
• 10 आणि 12 वीचे प्रमाणपत्र
• विमा पॉलिसी
कोरोना महामारीत MyGov Helpdesk चा वापर
मार्च 2020 मध्ये सरकारने व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) MyGov Helpdesk सुविधा उपलब्ध केली होती. कोरोना महामारीच्या काळात या सेवेचा नागरिकांना फायदा झाला. या हेल्प डेस्कच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूबाबत अचूक माहिती, वॅक्सिन बुकिंग, वॅक्सिन सेंटरबाबत माहिती आणि वॅक्सिन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची सुविधा दिली जात होती. आतापर्यंत जवळपास 80 दशलक्ष लोकांनी या हेल्पडेस्कचा वापर केला. तसेच, जवळपास 33 दशलक्ष वॅक्सिन सर्टिफिकेट डाऊनलोड केले गेले. दरम्यान, डिजिलॉकर (Digilocker) प्लॅटफॉर्मवर ही तब्बल 100 दशलक्षहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. तर या सेवेच्या माध्यमातून 500 कोटीपेक्षा अधिक कागदपत्रं डाऊनलोड करण्यात आली आहेत.
या सेवेचा लाभ घेऊन तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रं मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या हातात कायम ठेऊ शकता. ऐनवेळी गरज पडल्यास तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही.