देशाचा परकीय चलनसाठा 600 अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबतची आकडेवारी स्पष्ट केली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत परकीय गंगाजळीत घट झाली असल्याचे यातून निष्पन्न होत असले तरी भारताने सर्वाधिक परकीय गंगाजळी असलेल्या टॉप-5 देश देशांच्या यादीत आपले स्थान अबाधित ठेवले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाठा 7.27 अब्ज डॉलरने घसरून 594.88 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला आहे. ,मागील महिन्यात भारताचा परकीय चलनसाठा 602.16 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला होता.
सोन्याच्या साठ्यातही घट
एकीकडे परकीय चलनसाठा कमी होत असताना देशातील सोन्याचा साठा देखील कमी झाल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार भारताचा सोन्याचा साठा 515 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 43.82 अब्ज डॉलर इतका झाला आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून भारत नवव्या क्रमांकावर आहे.
India's forex reserves drop by USD 7.27 billion to USD 594.89 billion for the week ended August 18: RBI data
— Press Trust of India (@PTI_News) August 25, 2023
सर्वाधिक परकीय चलनाचा साठा असलेले टॉप-5 देश
- चीन - 3384 अब्ज डॉलर
- जपान - 1,253 अब्ज डॉलर
- स्वित्झर्लंड - 898 अब्ज डॉलर
- भारत - 594.88 अब्ज डॉलर
- रशिया - 585 अब्ज डॉलर
परकीय चलनसाठा का घटला?
गेल्या एकाही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होताना दिसतो आहे. फेडरल बँकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) त्यांच्या शेयरची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. आर्थिक अनिश्चितता अमेरिकेतील व्यापारी आणि सामन्यांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होताना दिसतो आहे. परिणामी रुपयाचे अवमूल्यन कमी करण्यासाठी रिझर्व बँकेला डॉलर्स विकावे लागले आहेत. त्यामुळे भारताच्या परकीय साठ्यात घट झाल्याचे बोलले जात आहे.