नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी (Netflix OTT) कंपनीला तोटा सहन करावा लागत असल्यामुळे कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीला गेल्या काही दिवसात मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असून खर्च वाढतच जाणारा असल्यामुळे नेटफिक्लिक्सने त्यांच्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीने हा टोकाचा निर्णय घेतला. उत्पन्नात घट होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावं लागत आहे. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून 300 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचं नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी करताना म्हटले की, या कर्मचाऱ्यांनी नेटफ्लिक्ससाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि या कठीण काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मागील महिन्यातही कंपनीने 150 कामगारांना कामावरून काढून टाकलं होतं. नेटफ्लिक्सकडून प्लॅटफॉर्म पुन्हा रुळावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नेटफ्लिक्समध्ये सध्या 11 हजार कर्मचारी आहेत; तर 221.6 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.
सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट
नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्समध्ये एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे नेटफ्लिक्सने सांगितलं आहे. ही घट गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी घट आहे. याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर आणि शेअर्सवरही झाला आहे. यामुळे नेटफ्लिक्सच्या गुंतवणूकदारांनाही अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन करावं लागलं आहे. या वर्षभरात नेटफ्लिक्सचा शेअर सुमारे 70 टक्क्यांनी घसरला आहे.
सबस्क्रायबर्स कमी होण्यामागे पासवर्ड शेअरिंग कारणीभूत
नेटफ्लिक्सचे एक खाते अनेक जण वापर असल्याने कंपनीचे सबस्क्रायबर्स कमी होऊ लागले आहेत. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. पासवर्ड शेअरिंगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठी घट झाली आहे.
नेटफ्लिक्सचे चार्जेस काय आहेत?
नेटफ्लिक्स सध्या स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा कोणत्याही स्ट्रिमिंग डिव्हाईससाठी प्रत्येक महिन्याचा दर फिक्स करण्यात आला आहे. याचे प्लॅन किमान 149 रूपयांपासून 649 रूपयांपर्यंतचे आहेत. यासाठी कोणतीही अतिरिक्त फी आकारली जात नाही किंवा कॉन्ट्रॅक्टही केलं जात नाही, असं नेटफ्लिक्सने वेबसाईटद्वारे सांगितलं आहे.