जागतिक पातळीवरील दुसरे श्रीमंत उद्योजक अशी झेप घेणारे गौतम अदानी नवीन खेळी करण्याच्या तयारी आहेत.ऊर्जा,विमानतळे,एफएमसीजी यासारख्या क्षेत्रात विस्तार केल्यानंतर अदानी यांनी मुंबईतील स्थावर मालमत्ता क्षेत्रात आक्रमक विस्ताराची तयारी सुरु केली आहे. डीबी रिअल्टी या कंपनीमध्ये अदानी रियल्टीचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव अदानी समूहाच्या विचाराधीन आहे. मात्र या वृत्ताने डीबी रियल्टीचा शेअर (DB Realty Stock)तेजीने झळाळून निघाला आहे.
डीबी रियल्टीचा शेअर आज मंगळवारी 20 सप्टेंबर 2022 रोजी 4.96% ने वधारला आणि तो 120.65 रुपयांवर पोहोचला. मागील महिनाभरात डीबी रियल्टीचा शेअर 100% नी वाढला आहे.यापूर्वी कालच्या सत्रात सोमवारी डीबी रियल्टीचा शेअर 4.96% वाढला होता.मागील सहा सत्रात हा शेअर 25% वाढला आहे.सलग 22 सत्रांमध्ये डीबी रियल्टीच्या शेअरमध्ये सरासरी 120% ने वाढ झाली असून तेजीची ट्रेंड कायम आहे.
गौतम अदानी यांची अदानी रियल्टी कंपनी आणि डीबी रियल्टीमध्ये विलीनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे.अदानी रियल्टीची कमर्शिअल आणि लक्झरी प्रॉपर्टीमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. त्यासाठी मुंबईतील डीबी रियल्टीला सोबत घेण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. हा व्यवहार झाला तर तो रियल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.
अदानी बनले दुसरे श्रीमंत उद्योजक
गौतम अदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक केली तर काही कंपन्या विकत घेतल्या.परिणामी त्यांनी भारतातील रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना केव्हाच मागे टाकले आहे.फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या नवीन यादीनुसार अदानी यांनी अमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकत दुसरा क्रमांकांवर झेप घेतली आहे.एकूण 273.5 अब्ज डॉलर संपत्तीसह टेस्लाचे इलॉन मस्क हे अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत.