Dairy Industry Business: अनेक शेतकरी शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. दिवसेंदिवस दुधाचे दर वाढतच चालले आहे. परंतु, त्याचा खरा लाभ व्यावसायिकांना होतो का? हा खरा प्रश्न आहे. मात्र, या सर्व गोष्टींची पर्वा न करता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या छाया देशमुख यांनी अतिशय कष्टाने स्वत:चा दुग्ध व्यवसाय सुरु केला.
Table of contents [Show]
खाणावळ व्यवसाय देखील चालविला
पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या छाया यांना बाहेर नोकरी करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे 2001 ते 2018 या काळात त्यांनी खाणावळ सुरु केली. या ठिकाणी शंभर मुलांचा स्वयंपाक केल्या जात असे. परंतु, कोरोना मुळे खाणावळ बंद पडली आणि छाया यांच्यापूढे आता पूढे काय करायचं? असा प्रश्न उभा राहीला.
कोरोनाने दिली दुग्धसंकलनाची संधी
कोरोना काळात खाणावळीचा व्यवसाय बंद पडला आणि अनेकांनी लाख-दीड लाख रुपये बुडविले. त्यानंतर छाया यांनी चांदूररेल्वे येथे असलेला प्लॉट विकून दुग्ध व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय उभारत असतांना देखील त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्या हरल्या नाही. वडीलोपार्जित अडीच एकर शेतात त्यांनी गोठा बांधला. जनावरांसाठी गोठा तयार करण्यास त्यांना 40 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर भारतीय स्टेट बँक मधून 1 लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्या पैशांनी छाया यांनी एचएफ आणि जर्सी गाईची खरेदी केली. आज त्यांच्याकडे 6 जर्सी गाईंसह 20 जनावरे आहेत. जनावरांसाठी लागणारा चाऱ्याची लागवड शेतातच केली जाते.
वर्षाला लाखोंचा नफा
छाया यांनी व्यवसाय सुरु केला तेव्हा 40 लिटर दूधसंकलन व्हायचे. त्यानंतर जनावरांची संख्या वाढत गेल्याने आता 70 ते 80 लिटर दूधसंकलन केले जाते. हे दूध गावकऱ्यांसह गावातील एका प्रसिद्ध संकलन केंद्राला देखील पूरवले जाते. हे दूध 32 ते 40 रुपये लिटर प्रमाणे विक्री केल्या जाते. छाया देशमुख यांना या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला दीड ते 2 लाख रुपयांचा नफा होतो.
मायक्रो ट्रेनिंग सेंटर
'एनडीडीबी' या प्रसिध्द राष्ट्रीय संस्थेच्या प्रशिक्षणासाठी छाया यांची निवड झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जून 2021 मध्ये आघाडीच्या खासगी कंपनीच्या 'मायक्रो ट्रेनिंग सेंटरची' सुविधा छाया यांना मिळाली. या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आजवर 422 नागरिक प्रशिक्षित झालेत. त्यामध्ये 88 महिलांचा सहभाग आहे. यामध्ये दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्या जाते.