LIC WhatsApp Services: आयुर्विमा महामंडळाने (LIC: Life Insurance Corporation) डिसेंबर 2022 मध्ये सर्व्हिस ऑन व्हॉट्सअॅप सुरू केले होते. व्हॉट्सअॅप सुविधेमुळे नव्या ग्राहकांना एलआयसीपर्यंत पोहोचणे सोप्पे झाले आहे, कोणतीही समस्या, शंका विचारणे सोप्पे झाले आहे, दोन महिन्यांमध्ये या सुविधेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 43 टक्के समस्या व्हॉट्सअॅपवरुन सोडवण्यास एलआयसीला यश मिळाले आहे, असे एलआयसी कस्टमर केअर झोनल मॅनेजर विशाल करंगुटकर यांनी महामनीला सांगितले.
एलआयसीची व्हॉट्सअॅप सेवा काय आहे? (What is WhatsApp service of LIC?)
डिसेंबर महिन्यात प्रत्यक्षात एलआयसीने व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. विमा कंपनीच्या या सुविधेमुळे, पॉलिसीधारकांना एलआयसी कार्यालयात जाण्याची गरज नाही किंवा सतत एजंटला कॉल करून प्रश्न विचारण्याची गरज उरलेली नाही, कारण आता थेट व्हॉट्सअॅपद्वारे सर्व कामे केली जात आहेत. या सुविधेद्वारे, एलआयसी पॉलिसीधारक काही विशेष सेवांचा लाभ घेत आहेत. तथापि, ज्या पॉलिसीधारकांनी आपल्या पॉलिसीची एलआयसी पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांना ही सुविधा उपलब्ध आहेच, शिवाय इतर प्रश्व असतील, पॉलिसी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.
दुसरीकडे, ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांना प्रथम व्हॉट्सअॅप सेवा वापरण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत साइटला भेट देऊन पॉलिसीची नोंदणी करावी लागेल. या नोंदणीबाबत व्हॉट्सअॅपवरही मार्गदर्शन केले जाते. एलआयसीकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यास पॉलिसीबाबतचे सर्व त्याबाबतचे तपशील जसे की मॅच्युरिटीची तारीख, हफ्त्याची तारीख, किती पैसे भरले आहेत याबाबत सांगते. एलआयसीला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यासाठी 8976862090 या मोबाईल क्रमांकावर 'हाय' (Hi) पाठवून ग्राहकांना पॉलिसी सेवांशी संबंधित माहिती घरी बसून मिळू शकेल.
प्रथम मोबाईल फोनमध्ये 8976862090 हा नंबर सेव्ह करणे आवश्यक आहे. जेणेकरून सहज व्हॉट्सअॅपवर संपर्क साधता येईल. हा एलआयसीचा अधिकृत व्हॉट्सअॅप सेवेचा नंबर आहे. सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करावे आणि या क्रमांकाचा चॅट बॉक्स उघडावा, चॅट बॉक्स उघडल्यानंतर हाय लिहून पाठवावे, मग लगेचच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे तेथे थेट पर्याय येतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या प्रश्नांसाठी संपर्क साधायचा आहे, ते पर्याय निवडून पुढील संभाषण साधता येईल.
कोणत्या 11 सेवा मिळतात? (What 11 services are available?)
एलाआयसीच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सर्वप्रथम निवडक पर्याय येतात, त्यानंतर निवडलेल्या पर्यायांवरुन पुढे विविध लिंक्स किंवा पर्याय येतात जेथे त्या प्रश्नाचे किंवा समस्येचे समाधान मिळू शकते. एलआयसी सध्या केवळ 11 मुद्द्यांची माहिती व्हॉट्सअॅपवर पुरवते. यात, प्रीमियम ड्यू, संबंधित व्यक्तीच्या पॉलिसीविषयी बोनस माहिती, धोरण स्थिती, कर्ज पात्रता कोटेशन, कर्ज परतफेड कोटेशन, कर्जाचे व्याज देय, प्रीमियम सशुल्क प्रमाणपत्र, युलिप युनिट्सचे विवरण, एलआयसी सेवा लिंक्स, ऑप्ट इन किंवा ऑप्ट आउट सेवा आणि संभाषण आदी सेवा पुरवल्या आहेत.