वझिर एक्स (WazirX) या देशातल्या अव्वल क्रिप्टो एक्सचेंजने (Crypto Exchange) 2022 सालात 21,22,925 नवीन ग्राहक जोडले. आणि यातले 27% लोक पहिल्यांदा क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करणारे होते. वझिर एक्सवर (WazirX) लोकांनी यावेळी शिब टोकनना (Shib Token) सर्वाधिक पसंती दिली. पण, ही सकारात्मक बातमी असतानाच वझिर एक्सने आपल्या वार्षिक अहवालात एक धक्कादायक बातमीही दिलीय. ग्राहकांची संख्या वाढलेली असता ना एक्सचेंजच्या ट्रेडिंग उलाढालीत तब्बल 76%ची घट झालीय.
कंपनीने आपल्या वेबसाईटवर नोव्हेंबर 2022 पर्यंतचा डेटा प्रसिद्ध केला आहे. आणि यात गेल्यावर्षी नोव्हेंबर पर्यंत जी उलाढाल 43 अब्ज अमेरिकन डॉलरची होती. ती आता 10 अब्जांवर पोहोचलीय, हे आवर्जून नमूद केलंय.
‘मागची पाच वर्षं आम्ही क्रिप्टोमध्ये व्यवहार करू इच्छिणाऱ्यांना चांगली सेवा देत आहोत. ग्राहकांना क्रिप्टोचे व्यवहार सोपे जावेत यासाठी प्रयत्न करतोय. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टोच्या बाबतीत आम्ही ग्राहकांमध्ये उत्साहही बघितला. पण, यावर्षी हा उत्साह अचानक कमी झाला आहे. आणि त्यात झालेली घट ही धोकादायक पातळीवर आहे,’ असं वझिर एक्स कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
एकूणच क्रिप्टो एक्सचेंजेस आणि गुंतवणुकदारांसाठी 2022 हे वर्षं फारसं चांगलं गेलेलं नाही. बिटकॉईन, इथिरिअम यासारख्या आघाडीच्या क्रिप्टोमध्ये प्रचंड घसरण झाली. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान तर झालंच. शिवाय जगभरातली मोठी एक्सचेंजही त्यामुळे बंद झाली. ल्युना (Luna) ही क्रिप्टोकरन्सीच (Cryptocurrency) गाळात गेली. तर जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज FTX बंद झालं.
भारतातही त्यामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक थंडावली आहे, असंच या अहवालातून दिसत आहे. वझिरएक्सवर 21 लाख नवीन ग्राहक मात्र जोडले गेले आहेत. म्हणजेच सध्या गुंतवणूक थंडावली असली तरी भविष्यात अजूनही लोकांचं क्रिप्टोच्या बाजारपेठेकडे लक्ष असेल.
शिब टोकनमधील उलाढाल वाढल्याचंही कंपनीने नमूद केलंय. तर बिटकॉईन, USDT, शिब, WRX, इथिरिअम, TRX, डॉज (Doge) आणि मॅटिक (Matic) या क्रिप्टोंच्या टोकनना ग्राहकांची पसंती होती.
फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2022) सुरू असताना socios.com या फॅन पोर्टलने चिलिझ टोकन्स (ChiliZ Token) उपलब्ध करून दिली होती. या टोकनमुळे फुटबॉल प्रेमींना त्यांची आवडती टीम किंवा खेळाडूंसाठी व्होटिंग करता येत होतं. या टोकननला अलीकडे तरुणांची चांगला प्रतिसाद दिला.
तर एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्याचा परिणाम डॉजकॉईन (Doge) वर झाला. ऑक्टोबर महिन्यात ही क्रिप्टोकरन्सी 1300 टक्क्यांनी वर गेली होती. कारण, एलॉन मस्क या क्रिप्टोकरन्सीबद्दल नियमितपणे ट्विट करायचे. त्यांनीच ही करन्सी लोकप्रिय केली होती. पण, त्यांनी ट्विटर ताब्यात घेतलं तेव्हा निर्माण झालेले वाद पाहता लोकांनी डॉजकॉईन विकायलाही सुरुवात केली.
वझिरएक्सवरच्या गिफ्ट कार्डना 11 लाख लोकांनी पसंती दिल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.