कच्च्या तेलाचा भरमसाठ साठा आणि मागणी कमी झाल्याने तेलाच्या किंमतीत दररोज घसरण होत आहे. मागील महिनाभरात क्रूड ऑइलचा भाव प्रती बॅरल 15% ने कमी झाला मात्र पेट्रोल आणि डिझेल दर कपातीबाबत कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. मागील सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. (Petrol Diesel Price Remained High Since May 2022)
क्रूडचा भाव 4 नोव्हेंबरपासून 15% ने कमी झाला आहे. (Crude Oil Price Fall by 15%) चालू आठवड्यात त्यात 4% घसरण झाली होती. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल 84.65 डॉलर इतका खाली आला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव प्रती बॅरल 77 डॉलर इतका खाली आला आहे. मार्च 2022 च्या तुलनेत क्रूडचा भाव तब्बल 55 डॉलरने कमी झाला आहे. मात्र याच कालावधील देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कपातीबाबत मौन धारण केले आहे.
भारतीय कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 320 रुपयांची घसरण झाली. क्रूडचा भाव 6400 रुपये प्रती बॅरल इतका खाली आला. इंधनाचे दर कमी होत असताना ग्राहकांना मात्र थेट फायदा होत नसल्याचे चित्र आहे. भारतीयांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ विक्रीचे दर मे महिन्यापासून जैसे थेच आहेत. भारतातील पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी, सीएनजी यांचा दर आंतररराष्ट्रीय बाजाराशी संलग्न आहे. ज्यावेळी कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढतो तेव्हा कंपन्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करतात, मात्र क्रूडचा भाव कमी झाला तरी कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आज शनिवारी 26 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 106.32 रुपये आणि डिझेलचा भाव 94.27 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 96.72 रुपये आणि डिझेलचा भाव 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये असून चेन्नईत पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे. यात केंद्र सरकार आणि राज्य पातळीवरील स्थानिक पातळीवरील करांचा समावेश असल्याने इंधन महाग आहे.
तोटा भरुन काढण्यासाठी कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न (Oil Marketing Companies Recovering Losses)
रशिया आणि युक्रेन युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूडचा भाव विक्रमी 139 डॉलर प्रती बॅरल इतका वाढला होता. आता तो 85 डॉलरखाली आला आहे. मात्र असे असले तरी पेट्रोल आणि डिझेलचा भाव क्रूडच्या तुलनेने कमी झालेला नाही. युद्धामुळे क्रूडमध्ये झालेल्या प्रचंड भाववाढीचा फटका भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना बसला होता. पेट्रोलियम कंपन्यांना 6.5 ते 7 बिलियन डॉलरचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. हा तोटा भरुन काढण्यासाठी इंधन दर दीर्घकाळ जैसे थेच ठेवण्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. अर्थात यासाठी केंद्र सरकार देखील तितकेच जबाबदार आहे. दुसऱ्या तिमाहीत इंडियन ऑइल कंपनीला 272 कोटींचा तोटा झाला होता.
केव्हा झालेला इंधन दरात शेवटचा बदल (Last Price Rivision)
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईजमध्ये अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात कपात केली होती. महाराष्ट्रात देखील सत्तांतर झाल्यानंतर जुलै महिन्यात पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपये आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची कपात केली होती. दरम्यान, 21 मे 2022 नंतर आज 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशांतील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच आहेत.
निवडणुकांमुळे होतो परिणाम (State Election Programmes)
नुकताच हिमाचल प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याशिवाय डिसेंबर महिन्यात गुजरातमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये इंधन दर कपात केल्यास त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून आचार संहिता लक्षात घेत इंधन दर ’जैसे थे'च ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. यापूर्वी नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला होता. या पाच महिन्यांत पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.