Crop Insurance Claim: नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वातावरणातील विशिष्ट बदलांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान होते. हे नुकसान शेतकऱ्यांना भरून मिळावे यासाठी सरकारने पीक विमा योजना आणली. या पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना इन्शुरन्सचा लाभ मिळतो.
नुकतीच प्रधान मंत्री पीक विमा योजनेमध्ये (PM Fasal Bima Yojana-PMFBY) नोंदणी करण्याची मुदत 31 जुलैला संपली होती. पण महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करत 3 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांत पीक विमा देण्यात आला.
पीक विमा हा सरकारचा एक प्रकारचा आर्थिक मदत करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ही मदत मिळवण्यासाठी ज्या नियम आणि पात्रता घालून दिलेल्या आहेत. त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती पूर्तता होत नसेल तर संबंधित शेतकऱ्याचा पीक विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो. अशाप्रकारे इन्शुरन्स नाकारण्याची बरीच कारणे आहेत. त्यातील काही कॉमन कारणे जी सहज टाळता येतील. त्याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
महत्त्वाच्या डेडलाईन पाळणे
रेग्युलर इन्शुरन्सप्रमाणेच क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पीक विम्यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या डेडलाईन पाळणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे पीक घेतले आहे आणि त्याच्यासाठीची अंतिम तारीख काय आहे. हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. दिलेल्या मुदतीत किंवा अंतिम तारखेच्या आत क्लेमची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग होता. अन्यथा तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर पडता. त्यामुळे महत्त्वाची डेडलाईन चुकवली नाही पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे जमा करणे
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून पीक विम्याचा दावा करताना त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दिली जात नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया लांबत जाते किंवा क्लेमची वेळ निघून जाते. काही प्रकरणात शेतकऱ्यांकडून योग्य पद्धतीने पुरावे सादर केले जात नाही. तेव्हा कंपनीकडून विचारणा होते. तेव्हा ते पुरावे प्रत्यक्षात नष्ट झालेले असतात. त्यामुळे दाव्याबरोबर महत्त्वाची कागदपत्रे जोडली गेली आहेत ना, याची खात्री केली पाहिजे.
विमा कंपन्यांना सुचित करणे
शेतकऱ्यांना आपले पीक अडचणीत येणार याचा काही प्रमाणात अंदाज असतो. म्हणजे जिथे नैसर्गिक आपत्ती लागू होत नाही. तिथे शेतकऱ्यांना पिकांमधून किती आणि कसे उत्पादन मिळू शकते. याचा एक अंदाज असतो. त्याच प्रमाणे नुकसानीचा सुद्धा त्यांना अंदाज असतो. अशावेळी पीक विमा कंपन्यांना पीक अडचणीत येण्याची कुणकुण लागल्यावर लगेच त्याची माहिती देणे गरजेचे आहे. कारण नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यावरच त्याचा क्लेम पुढे पाठवता येतो. त्यामुळे विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीची माहिती वेळेत कळवली पाहिजे.