Credit Cards Can't Use For Pay Policy Loan : आयआरडीएआय ने 4 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड क्रेडिट कार्डद्वारे करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यानुसार, सर्व जीवन विमा कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे की, विमा पॉलिसींवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी क्रेडिट कार्ड पेमेंट थांबवावे.
विमा पॉलिसी कर्ज घेण्याचे फायदे
पॉलिसीधारक त्यांच्या विमा पॉलिसी गहाण (mortgage) ठेवून कर्ज घेऊ शकतात , असे करणे कर्जदारांसाठी फायदेशीर असते. कारण हे कर्ज घेताना गहाण किंवा तारण (mortgage) म्हणून इतर कोणत्याही मालमत्तेची आवश्यकता नाही. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचा पर्याय म्हणून, तुम्ही तुमच्या जीवन विमा पॉलिसीमधून घेऊ शकता. कर्जाची रक्कम तुमच्या पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूद्वारे निर्धारित केली जाते. या कर्जावर आकारले जाणारे व्याज दर, तसेच कर्ज परतफेडीचे पर्याय, पॉलिसीधारकानुसार बदलू शकतात.
कुठल्या प्रकारच्या पॉलिसीवर कर्ज मिळते?
प्रत्येक विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. त्यामुळे कुठलीही पॉलिसी घेण्यापूर्वी आपण आधी संपूर्ण विचारपूस करून पॉलिसी घ्यावी. संपूर्ण जीवन पॉलिसी, मनी-बॅक पॉलिसी, बचत योजना आणि एंडाउमेंट पॉलिसीवर कर्ज मिळू शकते.
कर्जाची रक्कम किती मिळते?
जीवन विमा पॉलिसीच्या सरेंडर मूल्याद्वारे कर्जाची रक्कम निर्धारित केली जाते. बहूतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80 टक्के कर्ज दिले जाते. तसेच संपूर्ण कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी विमा कंपनी किंवा वित्तपुरवठा संस्थेद्वारे अल्प प्रमाणात शुल्क लागू केले जाते.
SBI कर्ज रकमेच्या 0.35 टक्के शुल्क आकारते. किमान 500 आणि कमाल 2,500 रुपये शुल्क आणि GST शुल्क आकारले जाऊ शकते. विमा पॉलिसीवर मिळालेल्या कर्जाचे व्याजदर हे वैयक्तिक कर्जावरील व्याजदरापेक्षा कमी असतात. तसेच विमा पॉलिसीवर कर्ज मिळण्यासाठी पॉलिसी तीन वर्ष नियमित सुरू असावी. म्हणजेच पॉलिसीचे हप्ते वेळेवर भरलेले असावेत.