देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहेत. बँकिंग (Banking) सेवेच्या विस्ताराबरोबरच क्रेडिट कार्डचा विस्तारही वाढत आहे. यासोबतच क्रेडिट कार्डशी संबंधित नियमदेखील बदलत आहेत. रिझव्र्ह बँक (Reserve Bank of India) आता याविषयी नवा बदल करण्याच्या तयारीत आहे. हा बदल प्रत्यक्षात आल्यानंतर क्रेडिट कार्डच्या बाबतीतही ग्राहक त्याचप्रकारे पोर्ट करू शकतील, ज्याप्रमाणे सध्या मोबाइल नंबरच्या बाबतीत करतात. फायनान्शियल एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
क्रेडिट कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी
ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशानं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची (MNP) सुरुवात करण्यात आली. तुम्ही तुमच्या सध्याच्या सेवा प्रदात्यावर खूश नसाल तर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर सहज पोर्ट करू शकता. असंच काहीसं रिझर्व्ह बँकेला क्रेडिट कार्डच्या बाबतीत करायचं आहे. त्याला क्रेडिट कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी असं नाव देण्यात आलं आहे.
क्रेडिट कार्ड नेटवर्क म्हणजे काय?
तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या कार्डवर मास्टर कार्ड, व्हिसा, रुपे, डायनर्स क्लब यापैकी एक नाव पाहिले असेल. हे क्रेडिट कार्ड नेटवर्क आहेत. क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी बँका या नेटवर्कशी टाय-अप करत असतात. या नेटवर्कमुळे क्रेडिट कार्ड व्यवहार शक्य होत असतात. म्हणजेच एकप्रकारे ते वेगवेगळ्या बँकांमधल्या पुलासारखं काम करतात.
रिझर्व्ह बँकेचं म्हणणं काय?
ग्राहकांना त्यांच्या पसंतीचं क्रेडिट कार्ड नेटवर्क निवडण्याची सुविधा असावी, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँकेनं याबाबतचं मसुदा परिपत्रक जारी केलं आहे. जर हा मसुदा नियम झाला तर बँका तुम्हाला स्वतःहून कोणत्याही नेटवर्कचं क्रेडिट कार्ड तुम्हाला देऊ शकणार नाहीत. तर आधी बँकांना तुम्हाला विचारावं लागणार आहे.
Credit Card portability is here.
— Financial Express (@FinancialXpress) July 6, 2023
You will be able to change from Visa to MasterCard to RuPay or any network soon. Know what RBI said#CreditCard #RBI #DebitCard #ReserveBankofIndia https://t.co/XMSejOrHFp
जुन्या कार्डवर मिळणार सुविधा
जर कोणाकडे आधीच क्रेडिट कार्ड आहे आणि त्यांना त्यांचं नेटवर्क बदलायचं असेल तर तेदेखील शक्य असणार आहे. रिझर्व्ह बँकेनं मसुद्यात यासाठीही तरतूद केली आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डची वैधता असते. साधारणपणे 1 वर्ष, 2 वर्षे, 4 वर्षे अशाप्रकारे त्याचा कालावधी असतो. यासाठी तुम्ही तुमच्या कार्डची एक्सपायरी डेट पाहू शकता. त्यानंतर कार्ड रिन्यू करावं लागेल. जुन्या ग्राहकांना कार्ड रिन्यू करताना नेटवर्क बदलण्याचा पर्याय मिळणार आहे.
ग्राहकांना फायदा
रिझर्व्ह बँकेच्या या तरतुदीचा सर्वात जास्त फायदा ग्राहकांना होणार आहे. वेगवेगळे नेटवर्क आपल्या कार्डवर वेगवेगळी फीचर्स देत असतात. काही कार्डांवर कमी फी असते, तर काहींना जास्त रिवार्ड असतात. अशाप्रकारे प्रत्येक नेटवर्कसाठी कॅशबॅक आणि रिवार्डमध्ये विविधता आहे. नेटवर्क बदलण्याची सुविधा मिळाल्यानंतर ग्राहकांना आपल्या गरजेनुसार निवड करता येणार आहे.
'रुपे'ला लॉटरी
या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर ग्राहकांसह रुपेलाही फायदा होणार आहे. रुपे हे स्वदेशी नेटवर्क आहे. रिझर्व्ह बँकेनं आधीच क्रेडिट कार्डसाठी यूपीआय सुविधा सुरू केली आहे. अर्थात ही सुविधा प्रत्येकासाठी नाही. केवळ रुपे कार्ड यूझर्सच यूपीआयचा वापर करू शकतात. अशात नेटवर्क बदलण्याची सुविधा मिळाल्यानंतर मोठ्या संख्येनं यूझर्स रुपेचा वापर करू शकतात.