Cow Dung Tractor: शेती करण्यासाठी शेतकरी अनेक आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. पूर्वी नांगरणीसाठी नांगर आणि बैलाचा वापर केला जायचा. काळ बदलला आणि त्याजागी ट्रॅक्टर(Tractor) आला. याच ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी, पेरणीपासून ते काढणीपर्यंत ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ लागला. मात्र ट्रॅक्टर चालविण्यासाठी डीझेल(diesel) अतिशय गरजेचे असते. कच्च्या तेलाच्या(Crude Oil) कमतरतेमुळे पेट्रोल, डीझेलच्या किंमती(Petrol and Diesel Price High) या गगनाला भिडलेल्यात हे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळेच तर ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी खर्चिक बाब बनत चालली आहे. मात्र यावर एक उपाय म्हणून ब्रिटीश कंपनी बेनामनने(Benaman) गाईच्या शेणावर चालणारा ट्रॅक्टर(Tractor) बनवलाय. नक्की कसा आहे हा ट्रॅक्टर चला जाणून घेऊयात.
ट्रॅक्टर चालवण्यासाठी गाईच्या शेणातील मिथेन वायुचा वापर
भारतीय संस्कृतीत गाईच्या शेणाला अतिशय महत्व आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. गाईच्या शेणापासून खत, रंग याशिवाय ग्रामीण भागात इंधन म्हणून देखील वापर केला जातो. पण गाईच्या शेणाचा वापर इंधन म्हणून करून ब्रीटनमधील बेनामन(Benaman) कंपनीने चक्क ट्रॅक्टर चालवला आहे. यासाठी त्यांनी गाईच्या शेणातील मिथेन वायुचा वापर केला आहे. हा ट्रॅक्टर 270 हॉर्स पॉवरचा असून डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच हा देखील शक्तिशाली आहे. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरमुळे प्रदुषणही कमी होत असल्याने पर्यावरणासाठी हा ट्रॅक्टर अतिशय फायदेशीर आहे. डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत हा ट्रॅक्टर चालवण्यासाठी खर्चही कमी प्रमाणात होत आहे.
या ट्रॅक्टरमुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण घटले
बेनामन कंपनीने एका दशकाहून अधिक काळ बायोमिथेन(Biomethane) उत्पादनावर संशोधन केले आहे. बायोमिथेन तयार करण्यासाठी कंपनीने 100 गायी(Cow) असलेल्या गोठ्यामध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी एक वेगळे युनिट तयार केले आहे. या युनिटमध्ये गाईचे शेण व मूत्र गोळा करुन त्यातून बायोमिथेनची(Biomethane) वायूची निर्मिती केली जाते. हे द्रवरुप बायोमिथेन -160 अंश तापमानावर क्रायोजेनिक टाक्यांमध्ये भरून ही टाकी ट्रॅक्टरवर बसवण्यात येते. या मिथेन वायुमुळे ट्रॅक्टरला डिझेल प्रमाणेच ड्रायव्हिंग पॉवर देखील मिळते. यासाठी कंपनीने या ट्रॅक्टरच्या एक वर्ष चाचण्यामधून परीक्षण देखील केले आहे. या ट्रॅक्टरमुळे एका वर्षात कार्बन डायऑक्साईडचे(Carbon Dioxide) उत्सर्जन 2,500 मेट्रिक टनांवरून 500 मेट्रिक टनांपर्यंत कमी झाल्याचे देखील दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवॉल काउंटीमध्ये घेतलेल्या चाचण्यांवरुन दिसून आले आहे.