पुण्यातील सहकार क्षेत्रात नावाजलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची (Cosmos Cooperative Bank Ltd) 117वी सर्वसाधारण वार्षिक सभा पुण्यात पार पडली. या सभेवेळी आर्थिक वर्ष 2022-23 मधील बँकेचा वित्तीय लेखाजोखा मांडण्यात आला. यामध्ये बँकेच्या सभासदांना बँकेकडून 8 टक्के लाभांश वाटपाच्या प्रस्तावासह मुंबईतील शारदा सहकारी बँकेच्या विलीनिकरणाच्या ठराववर एकमताने मंजुर करण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने चांगला व्यवसाय केला असून तब्बल 151 कोटींचा निव्वळ नफा मिळाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.
कॉसमॉस सहकारी बँकेने (Cosmos bank) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 30745 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. तसेच बँकेच्या ठेवी 17,629 कोटींवर पोहोचल्या आहेत. मार्च 2023 अखेरपर्यंत बँकेने एकूण 13,116 कोटींचे कर्जवितरण केले. या माध्यमातून बँकेने आर्थिक वर्षात कर देण्यापूर्वी 213 कोटींचा नफा कमावला आहे. त्यामध्ये बँकेला 151.41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक निव्वळ नफा असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
सभासदांना मिळणार 8 टक्के लाभांश
कॉसमॉस बँकचे मल्टी स्टेट नेटवर्क आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने सर्वाधिक नफा कमावला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2022-23 साठी बँकेकडून सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळताच सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे.
‘सिटी सहकारी’च्या विलिनीकरणाला मंजुरी
बँकेच्या 7 राज्यात 159 शाखा आहेत. बँकेने नुकतेच मुंबईतील मराठा सहकारी बँक आणि साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या विलीनिकरणाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर मुंबईतील सीटी को -ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरण योजनेला सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली आहे. या विलीनिकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर कॉसमॉस बँक मुंबईत लक्षणीय व्यवसाय विस्तार करेल.