हवामानात होणाऱ्या बदलांनी मागील आठवडभरात रोजच्या तापमानात वाढ झाली आहे. शहरांमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर्स, कुलर यांच्या मागणीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. कन्झुमर ड्युरेबल उत्पादक कंपन्यांनी एसी, कुलर्स यांचे उत्पादन आणि स्टॉकचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे.
उन्हाळा म्हटले कि एसी आणि कुलर्स, पंखे यांच्या मागणी मोठी वाढ होते. उत्तर भारतात कडक उन्हाळा जाणवतो. त्यामुळे या भागात मोठ्या क्षमतेच्या एसींना मागणी असते. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर यंदाचा समर सिझन कंपन्यांना मोठी व्यावसायिक संधी म्हणून उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्यांनी एसी आणि कुलर्सची नवीन श्रेणी बाजारात आणण्याची तयारी केली आहे.
बाजारात स्प्लिट एसी, विंडो एसी आणि पोर्टेबल एसी असे पर्याय उपलब्ध आहेत. एसीची किंमत ही त्याची क्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेनुसार ठरवली जाते. याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार एसीमध्ये नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तशाच प्रकारे एअर कुलर्सचे देखील विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. एसीची किंमती साधारण 20 हजारांपासून 80 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कुलरचा दर 4000 पासून 15 ते 20 हजारांच्या दरम्यान आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर एसी आणि कुलर्सवर डिस्काउंट ऑफर्स आहेत.
एअर कंडिशर्सच्या बाजारपेठेवर महागाईचा फारसा परिणाम झाला नाही. कंपन्यांनी एअर कंडिशनर आणि कुलर्सवर कंपन्यांनी ऑफर्स देखील देऊ केल्या आहेत. त्याशिवाय झीरो डाऊन पेमेंटच्या पर्यायामुळे एसी, कुलर्स ही उत्पादने सर्वांच्या आवाक्यात आली आहेत. यामुळे कंपन्यांना यंदाच्या उन्हाळ्यात एसी आणि कुलर्सच्या विक्रीत वाढ होईल. दोन वर्षांतील कमी झालेला व्यवसाय वाढेल, असा विश्वास कंपन्यांना आहे.
शहरांमध्ये एअर कंडिशन ही आता गरज बनली आहे. आपण पाहिले तर प्रत्येक फ्लॅटमध्ये एसी असतो. त्यामुळे एअर कंडिशनर घरी असणे ही एकेकाळी चैनीची बाब होती. आता तसे काही राहिलेले नाही. मध्यम वर्गातील ग्राहक देखील घरी एसी बसवतात, असे विजय सेल्सचे अधिकारी निलेश गुप्ता यांनी सांगितले. उन्हाळा जसा वाढेल तशी एसीसाठी मागणी वाढत जाईल, असे त्यांनी सांगितले. सगळ्याच कंपन्यांनी यंदाच्या सिझनसाठी एसीचा पुरेसा साठा उपलब्ध केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुलरला मागणी वाढतेय
एअर कुलर हा एसीच्या तुलनेत परवडणारा पर्याय आहे. मध्यम वर्गाकडून एअर कुलरला सर्वाधिक पसंती आहे.मागील काही महिन्यात एअर कुलर्सची मागणी वाढली असल्याचे सिंफनी लिमिटेडने म्हटले आहे. उन्हाळा सुरु होण्यापूर्वी कुलर्सच्या सर्वच मॉडेल्स पुरेसा साठा उपलब्ध आहे. असे कंपनीने म्हटलं आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            