स्वत:चं घर असावं, हे अनेकांचे स्वप्न असते. मग काही जण जागा विकत घेऊन बांधतात तर काही इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करतात. मात्र, कोरोनानंतर घराचे स्वप्न पूर्ण करताना लोकांचा खिसा मोकळा होत आहे. कारण, मागील तीन वर्षात बांधकामाचा खर्च २८ टक्क्यांनी वाढल्याचे कोलियर्स इंडिया या संस्थेने केलेल्या अहवालात म्हटले आहे. बांधकाम क्षेत्रासोबतच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.
घरांच्या किमती वाढल्या
मागील तीन वर्षात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दरवर्षी बांधकाम खर्चात १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम कंपन्यांना खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून घरांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून सरकारने बांधकाम साहित्य निर्यात कमी केली असून आयातीवरील कर कमी केल्याने गृहनिर्माण खर्च स्थिरावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मजूर खर्च वाढला
बांधकामासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे सिमेंट, स्टील, अल्युमिनियम, कॉपरच्या किंमती वाढल्या आहेत. सोबतच मजूर आणि इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे विकासकांना पैशाची तंगी जाणवत आहे. कर्ज वाढत असून पैशांची कमतरता भासत आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून परिस्थितीत बदल झाला आहे. महत्त्वाच्या बांधकाम साहित्याच्या किंमती ८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अल्युमिनिअमची किंमती तर ५५ टक्क्यांनी घटली आहे. स्टीलच्या किंमती ६ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे बांधकामासाठी येणारा खर्च आता स्थिर झाला आहे.
जागतिक अस्थिरतेचा परिणाम
जागतिक महामंदी, चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे होणारे लॉकडाऊन आणि जागतिक घडामोडींमुळे पुढील काही महिने बांधकाम साहित्याच्या किंमती वरखाली होत राहतील. मागणी-पुरवठा, महागाईवर बांधकाम साहित्याच्या किंमती अवलंबून असतील. अशा परिस्थितीत बांधकाम व्यवसायिक नव्या बांधकाम प्रकल्पांच्या तारखा पुढे ढकलू शकतात. तसेच बांधकाम साहित्याच्या किंमती वाढत राहिल्या तर चालू प्रकल्पाचा खर्च वाढेल. परिणामी शेवटी घरांच्या किमती वाढतील, असे कोलियर्स इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले.
विकासक प्रकल्पांचे नियोजन आधीपासूनच करून ठेवत आहेत. घरांची बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. अचानक किंमती वाढण्यापेक्षा काही बांधकाम विकासक कच्च्या मालाचा साठा करून ठेवत आहेत, असेही ते म्हणाले.