चीन आणि काही दक्षिण आशियाई देशांमध्ये उत्परिवर्तीत कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा वेगाने वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना जगभर पसरतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही प्रवाशांची क्रमविरहीत (रँडम) कोरोना चाचणी सुरू केली आहे. जर पुन्हा कोरोनाचे संकट आलेच तर वैद्यकीय सेवा आणि इतर सर्वच आघाड्यावर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोविड विरोधातील लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा पॉलिसी देताना किंवा नूतनीकरण करताना सूट देण्याचा कंपन्यांनी विचार करावा, असे आवाहन भारतीय विमा नियामक संस्था IRDIA इर्डाने केले आहे.
विमा तसेच आरटीपीसीआर चाचणीत सूट द्या -
भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर वैद्यकीय व्यवस्था कोलमडली होती. श्रीमंत वर्ग सोडता मध्यम आणि खालच्या स्तरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. गंभीर कोरोना रुग्णांचे वैद्यकीय बील काही लाखांत येते. त्यामुळे नागरिकांचा आरोग्य विमा असेल तर हा खर्च विम्यातून भरुन निघेल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच कोरोना बाबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत इर्डाने विमा कंपन्यांना सूट देण्याची विनंती केली. तसेच विमा कंपन्यांशी संबधित नेटर्वक हॉस्पिटल किंवा लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी सूट द्यावी, असे आवाहन केले आहे.
कोरोना जनजागृतीत सहकार्य करा
विमा कंपन्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समाज माध्यमांद्वारे जगजागृती अभियान राबवावे, अशीही अपेक्षा इर्डाने व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन नुकतेच सरकारकडून केले आहे. मात्र, काही नागरिक अजूनही मास्कचा वापर करत नाहीत. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमा काढतानाही कंपन्यांनी नागरिकांना जागरुक करावे. कोणत्या देशांमध्यें चाचणी अनिवार्य आहे, किंवा कोरोना संबंधित कोणते नियम आहेत, याची माहिती विमा कंपनीने पॉलिसी खरेदी करताना नागरिकांना द्यावी, असे आवाहन इर्डाने केले आहे.
कोरोना काळातील विम्याचे दावे -
मार्च २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार विमा कंपन्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचे दावे निकाली काढले. याद्वारे १७ हजार २६९ कोटींचे टर्म इन्शुरन्सचे क्लेम पास झाले आहेत. तर सुमारे २६ लाखांचे आरोग्य विम्याचे दावे निकाली काढण्यात आले. कोरोनामुळे जर देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर 'वॉर रुम' स्थापन करण्याचा विचार इर्डा करत आहे. या वॉर रुमद्वारे नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना सहाय्य करण्यात येईल. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट हाताळताना अनेक त्रुटी राहिल्या होत्या. मात्र, आता सर्वच आघाड्यांवर योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.