अनेकवेळा आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic goods) खरेदी करण्यासाठी जात असतो. त्यावेळी पॅकेजिंगमध्ये काय आहे, ते कसं वापरायचं, संबंधित उत्पादन कुठून आयात (Import) केलं आहे यासह इतर कोणत्याही माहितीसाठी (Information), सूचना किंवा तक्रारीसाठी (Complaint) कोणाशी संपर्क साधावा, ही माहिती पूर्ण देण्यात येत नव्हती. पॅकिंग लहान असल्यानं या सर्व बाबी मांडता येत नव्हत्या. अशा लहान पॅकिंगवर माहिती देणं, त्याची प्रिंट (Print) आणि ग्राहकांनादेखील ते वाचणं सोयीचं नव्हतं. त्याला आता क्यूआर कोडचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. क्यूआर कोडमुळे (QR Code) दोन्ही समस्या दूर झाल्या आहेत.
सर्व तपशील सविस्तर
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पॅकिंगवर क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध आता होणार आहे. क्यूआर कोडमध्ये पॅकचा निर्माता, आयातदार, उत्पादनाची माहिती असणार आहे. क्यूआर कोडमध्ये त्याच्या वापराशी संबंधित माहितीदेखील देणं गरजेचं असणार आहे. उत्पादनाशी संबंधित माहिती, तक्रार, क्रमांक या सर्वांचे डिटेल्स त्यात असायला हवेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून अधिसूचना
सरकारने पॅकेजिंगसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी क्यूआर कोडमध्ये माहिती देणे बंधनकारक केलं आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या नव्या नियमामुळे या विभागात पारदर्शकता वाढणार आहे. सबस्टँडर्ड, अविश्वासू आणि बनावट असणाऱ्यांवर कारवाई करणं सोपं होणार आहे. व्यवहारामध्ये पारदर्शका यावी, हा यामागचा हेतू आहे.
ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया
ग्राहकांना उत्पादनाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या अनेक सेवा क्यूआर बेस्ड आहेत. क्यूआर कोडला जागा अत्यंत कमी लागते. त्यामुळे एखादं प्रॉडक्ट छोटं असेल तरी कमी जागा आहे म्हणून माहिती देणं टाळता येणार नाही. सर्व प्रकारची माहिती यातून मिळणार आहे. ग्राहकांकडूनही याबाबत सकारात्मकच प्रतिक्रिया आहेत.
या नवीन प्रणालीअंतर्गत पॅकेज केलेल्या वस्तूंची माहिती चार श्रेणींमध्ये उपलब्ध असणार आहे.
- पॅक केलेल्या वस्तूवर निर्माता, पॅकर किंवा आयातदार यांची माहिती स्वतंत्रपणे स्पष्टपणे दिलेली नसेल, तर क्यूआर कोड स्कॅन करून ती मिळवण्याची व्यवस्था असायला हवी. याशिवाय, उत्पादनाचा पत्ता आणि पॅकेजिंगची माहिती पॅकेटवर नसेल, तर क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहकांना ती मिळेल याची खात्री करावी लागणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या पॅकेटवर दिलेल्या क्यूआर कोडद्वारे, ग्राहकाला उत्पादन केव्हा बनवलं गेलं, कुठे बनवलं गेलं हे माहीत असायला हवं. याशिवाय त्या उत्पादनाचं जेनेरिक नाव आणि कमोडिटीचं नावदेखील उपलब्ध असलं पाहिजे. दुसरीकडे वस्तू एकापेक्षा जास्त असल्यास, बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक उत्पादनाचे डिटेल्स, त्याची संख्या, उत्पादनाची उत्पादन तारीख, उत्पादन, आयात, वापर, पॅकमधील वस्तू, तक्रार क्रमांक यासर्व बाबी असणं गरजेचं आहे.
- पाकिटावर संबंधित माहिती दिली नसेल तर क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्व माहिती मिळविण्यासाठी एक प्रणाली उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
- क्यूआर कोडद्वारे पॅकेटच्या उत्पादकाचं नाव, ई-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांकदेखील असला पाहिजे.