सध्या जगभरात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम अनेक मोठ्या कंपन्यांवर आणि स्टार्टअप उद्योगांवर झाला आहे. कॉस्ट कटिंगच्या (Cost Cutting) कारणास्तव अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अशा परिस्थितीत जागतिक मंदीचा भारतावर किती परिणाम झाला आहे, हे जॉब रिक्रुटमेंट करणाऱ्या Adecco, Randstad, Xpheno आणि ManpowerGroup या कंपन्यांकडून जाणून घेण्यात आले आहे. यामध्ये भारतीय नोकरदारांना दिलासा देणारी माहिती हाती आली आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या तुलनेत भारतात नोकरकपातीचे प्रमाण सर्वात कमी आहे. जागतिक स्तरावर जिथे 100 लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तिथे भारतात फक्त 2 ते 3 लोकांना नोकरी गमवावी लागली. याचा अर्थ भारतातील कर्मचाऱ्यांवर जागतिक मंदीचा परिणाम तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले आहे.
सर्वाधिक नोकरकपात कोणत्या कंपन्यांनी केली?
जॉब रिक्रुटमेंट करणाऱ्या Adecco, Randstad, Xpheno आणि Manpower Group या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, सर्वाधिक नोकरकपात टेक कंपनी, स्टार्टअप्स, ई- कॉमर्स कंपन्यांमध्ये करण्यात आली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक स्टार्टअप्स कंपन्यांना अलीकडच्या काळात निधीची कमतरता भासत होती. त्यांना नवीन गुंतवणूकदार भेटत नव्हते. अशा परिस्थितीत पैसे वाचवण्यासाठी आणि कंपनीला टिकवून ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतला.
जागतिक मंदीचा किती टक्के भारतीयांना फटका बसला?
2022 मध्ये जागतिक स्तरावर 2 लाख 40 हजार कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्यापैकी 11% कर्मचारी भारतीय होते. हे प्रमाण 2023 मध्ये खूपच कमी झाले आहे. 2023 मध्ये जागतिक स्तरावर एकूण 2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यापैकी भारतीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे फक्त 4% आहे.
जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या तुलनेत हे प्रमाण भारतात फारच कमी आहे. तसेच 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये नोकरकपातीचे प्रमाण 7% कमी झाले आहे. याचा अर्थ असा की, जागतिक मंदीचा भारतावर अद्याप मोठा परिणाम झालेला नाही, असे दिसून येते.
Source: economictimes.indiatimes.com