इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये आज गुरुवार 28 जुलै 2022 पासून राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांचे (कॉमनवेल्थ गेम्स) बिगुल वाजणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळांडूकडून खूप अपेक्षा आहेत. यात विशेष करुन बॅडमिंटन, हॉकी आणि महिला किक्रेट संघाकडे मेडल्स मिळवण्याची क्षमता आहे.
भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पदक विजेत्यांसाठी लाखो रुपयांच्या रोख बक्षिसांची घोषणा केली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूंना 20 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. सिल्व्हर मेडलसाठी 10 लाख आणि ब्रॉंझ मेडलसाठी 7.5 लाख रुपयांचे रोख बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय खेळाडूंनी 2018 मध्ये केली 66 मेडल्सची कमाई
- ऑस्ट्रेलियामध्ये 2018 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतानं तब्बल 66 पदके मिळवली.
- यात 26 गोल्ड मेडल्सचा समावेश होता. 20 सिल्व्हर मेडल्स आणि 20 ब्रॉंझ मेडल्सचा समावेश होता.
- या स्पर्धेत पदक तालिकेत भारत हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या स्थानी होता.
- आतापर्यंत भारताने कॉमनवेल्थ गेम्समधून 500 हून अधिक मेडल्स जिंकली आहेत.
- यंदाच्या स्पर्धेत भारत हा बहुतांश क्रीडा प्रकारात पदकासाठी दावेदार मानला जात आहे.
कॉमनवेल्थ गेम्स तिकिटांची किंमत! (Commonwealth Games Ticket Price)
बर्मिंगहॅम शहरात आजपासून सुरु होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी तिकिट विक्री खुली झाली आहे. तिकिटे ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. 18 वर्षांवरील प्रेक्षकांना तिकिट खरेदी करता येणार आहे. एका तिकिटासाठी 15 युरोचा दर आहे. अर्थात भारतीय चलनात तिकिटाचा भाव 1,213 रुपये इतका आहे. ( 1 युरो =80.89 रुपये)
मेडल्सची डिझाईन आणि निर्मितीचा रंजक प्रवास
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात आजपासून सुरु होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील मेडल्सचे डिझाइन विद्यार्थ्यांनी बनवले आहे. बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरी या संस्थेतील अॅम्बर अॅले, फ्रान्सिका विलकॉक्स आणि कॅटरिना केरिओ या तीन विद्यार्थ्यांनी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेडलची डिझाइन तयार केली.
यंदा विजेत्यांवर 1,875 मेडल्सची खैरात
- कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये विजेत्या खेळाडूंना तब्बल 1,875 मेडल्सने गौरवण्यात येणार आहे.
- एकूण 280 स्पर्धा असून यात खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ अशा तीन मेडल्सने गौरवण्यात येणार आहे.
- 72 देशांमधील 5,054 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
- 280 स्पर्धा होणार आहेत. यातील 136 स्पर्धा महिला गटात आणि 134 पुरुष गटाच्या स्पर्धा होतील.
गोल्ड मेडल्स खरंच सोन्याची असतात का?
- ऑलंपिक, कॉमनवेल्थ गेम्स यासारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्यांना दिली जाणारी मेडल्स शुद्ध धातूची बनवलेली असतात.
- गोल्ड मेडल मात्र याला अपवाद आहे. गोल्ड मेडल हे चांदीच्या धातूमध्ये तयार केले जाते. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो.
- 1908 च्या लंडन ऑलंपिकपासून गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेडल्स विजेत्यांना देण्यात येतात.
- शुद्ध सोन्यापासून तयार केलेली गोल्ड मेडल्स 1912 मधील स्टॉकहोम ऑलंपिक स्पर्धेत विजेत्यांना देण्यात आली होती. मात्र कॉमनवेल्थ गेम्समध्ये या मेडल्सचा कधी वापर झाला नाही.
- सिल्व्हर मेडल हे शुद्ध चांदीमध्ये तयार केलेले असते. ब्रॉंझ मेडल हे ब्रॉंझ धातूपासून तयार केले जाते.