गेल्या काही महिन्यांपासून हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, टोमॅटो, कांदे या रोजच्या वापरातील जिन्नसांची भाववाढ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अन्नधान्याच्या महागाईमुळे सरकार देखील चिंतेत आहे आणि यावर खास उपापयोजना करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
अशातच जून 2023 च्या मासिक आर्थिक आढाव्यात (Monthly Economic Review), वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केंद्र सरकार आणि RBI ला अन्नधान्य महागाई वाढल्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि नेहमीच्या गरजेच्या अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात असे या अहवालात म्हटले आहे. टोमॅटोचे भाव दिल्ली-एनसीआर परिसरात 300 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांमध्ये अजूनही टोमॅटो 150-170 रुपये किलो या दराने विकले जात आहेत. याशिवाय डाळी आणि कडधान्ये देखील कमालीची महागली आहेत. तूर, मसूर डाळीच्या किमती वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागतो आहे.
Ministry of Finance @FinMinIndia releases Monthly Economic Review #MER for June 2023.
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 3, 2023
For full report ➡️ https://t.co/pOhH3XUyef
Key highlights ? pic.twitter.com/VLjA8UjzXH
महागाईबाबत सावध राहण्याची गरज
Monthly Economic Review अहवालात आर्थिक व्यवहार विभागाने म्हटले आहे की, हवामानाशी संबंधित समस्यांमुळे फळे, भाज्या, कडधान्ये आणि संबंधित उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे मे 2023 मध्ये जिथे अन्नधान्य महागाई 3 टक्के होती, ती जून 2023 मध्ये 4.5 टक्के झाली आहे. अन्नधान्यांच्या महागाईत सरासरी 1.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणली जावी यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयने धोरण निश्चिती करण्याचा सल्ला देखील दिला गेला आहे.
तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता!
रशिया-युक्रेन युद्धानंतर खाद्यतेलांच्या किमती चांगल्याच भडकल्या होत्या. सामान्य नागरिकांना यादरम्यान मोठा आर्थिक भार सहन करावा लागला होता. आता मात्र सुर्यफुल, सोयाबीन तेलाच्या किंमती नियंत्रणात आल्या असल्या तरी धान्य कराराबाबत रशियाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम पुन्हा एकदा तेलाच्या आणि खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर पाहायला मिळू शकतो असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि आरबीआयने जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींकडे विशेष लक्ष दले पाहिजे असे देखील या अहवालात सूचित केले गेले आहे.