EV Production Plant: चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता बीवायडीने भारतात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. भारतीय नियामकांना गुंतवणुकीचे प्रस्ताव देताना ईव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीने परवानगी मागितली आहे.
Table of contents [Show]
भारतीय नियमकांना पाठविला प्रस्ताव
चीनच्या BYD कंपनीने स्थानिक कंपनीसोबत भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी बनवण्यासाठी 1 बिलियन डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे. खाजगी मालकीच्या हैदराबाद स्थित Megha Engineering & Infrastructure ने BYD सोबत हातमिळवणी केली आहे आणि त्यांनी भारतीय नियामकांना संयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव पाठवला आहे.
उत्पादन प्रकल्पाची योजना
BYD कंपनी त्यांच्या संपूर्ण सिरिज हॅचबॅक ते लक्झरी मॉडेल भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ईव्ही आणि प्लग-इन हायब्रीड वाहनांचे जगातील सर्वात मोठे उत्पादक असलेल्या BYD ने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. त्याच वेळी, बीवायडीने आधीच सांगितले आहे की, त्यांनी भारतात एक उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे.
भारतात सर्वात मोठे कार मार्केट
भारत देश हा जगातील तिसरा सर्वात मोठे कार मार्केट आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावरील कंपन्या भारतात वेगाने प्रगती करत आहेत. यापूर्वी, एलोन मस्कने आपली वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतात आणण्याची आणि 20 लाख रुपयांची टेस्ला कार लाँच करण्याची योजना उघड केली होती.
टेस्लाला देणार टक्कर
BYD चे भारतामध्ये स्वारस्य दाखवणे, हे टेस्लाला आव्हान देण्यासाठी वेगवान जागतिक विस्ताराचा एक भाग आहे. BYD अजूनही जागतिक इलेक्ट्रिक वाहन विक्रीत आघाडीवर आहे. भारतातील गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यास, BYD ला यूएसए वगळता सर्व प्रमुख जागतिक कार बाजारात जागा मिळेल.