चीनमध्ये मागील आठवडाभरात हजारो कोरानाबाधितांची वाढ झाली आहे.यामुळे अनेक शहरांमध्ये तातडीने टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. चीनी नागरिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट असून निदर्शने आणि आंदोलने केली जात आहे. सरकारने लागू केलेली टाळेबंदी, नागरिकांची उत्स्फुर्त निदर्शने यामुळे बड्या शहरांमध्ये अराजकता माजली आहे. याचा फटका आयफोन उत्पादक फॉक्सकॉन कंपनीला बसला आहे. फॉक्सकॉनला कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
फॉक्सकॉनकडून आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी 70% फोन्सची निर्मिती केली जाते. चीनमधील झेंग्झू प्रांतात फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे, मात्र कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव झाल्याने या प्रकल्पातील हजारो कामगारांनी घरची वाट धरली आहे. कामगारांना थांबवण्यासाठी फॉक्सकॉनकडून 1400 डॉलर्सचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कामगारांचे पलायन थांबवण्यात कंपनीला अपयश आले. दररोज हजारो कर्मचारी प्लान्ट सोडून पलायन करत आहे. कामगारांना रोखण्यासाठी कंपनीने बळाचा वापर केला आहे.
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे फॉक्सकॉनच्या आयफोन उत्पादनात 30% कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात आयफोनच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका अॅपलच्या शेअरला बसेल, असे बोलले जाते. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीविरोधात असंतोष खदखदत आहे. जबरदस्ती डांबून ठेवून काम करुन घेतले जात असल्याचा आरोप प्रकल्पातून पळून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या प्रकल्पात जवळपास 200000 हून अधिक कर्मचारी आहेत. मात्र पुन्हा कोरोनाची साथ पसरल्यानंतर झेंग्झू प्रांतात कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन नियमांचे काटेकोर पालन करावे लागत आहे.निर्बंधांमुळे हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. नोकरी ऐवजी जीव महत्वाचा आहे या भूमिकेने कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकला आहे.प्रकल्पाबाहेर मागील काही दिवसांत कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हिंसेच्या घटना घडल्या आहेत. कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी प्रकल्पाबाहेर हजारो पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला होता.
चीनची राजधानी बिजिंगमध्ये मंगळवारी 4000 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण कोराना रुग्णांची संख्या 40 हजारांवर गेली आहे. अनेक शहरांमध्ये नागरिकांकडून शि जिनपिंग (Xi Jinping) सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. गॉंगडोंग, झेंग्झू, ल्हासा या शहरात स्थानिकांकडून दिर्घकाळ सुरु असलेल्या लॉकडाउन उठवण्याची मागणी करण्यात येत आहे.