आजकाल अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची हौस असते. एखाद्या लहान बाळासारखी पाळीव कुत्र्याची, मांजराची किंवा इतर प्राण्याची ठेप ठेवली जाते. आपण सर्वांनीच असे पेट पॅरेंट्स आपल्या आजूबाजूला पाहिले असतील. परंतु जर कुठे आपल्याला प्रवासाला जायचे ठरल्यास प्राण्यांना घरात एकटे सोडून जाता येत नाही. त्यामुळे अनेकदा पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन बरेच लोक ट्रीपवर जातात. परंतु आपल्या पाळीव प्राण्याला सोबत घेऊन जर तुम्ही प्रवासाचे नियोजन करत असाल तर काही गोष्टींचा तुम्हाला विचार हाच करावाच लागेल कारण पेट सोबत असताना तुमचा खर्च वाढू शकतो.
चला तर जाणून घेऊयात या लेखात काही खास टिप्स ज्यात तुम्ही जेव्हा तुमच्या पेट सोबत बाहेर कुठे ट्रीपवर जायचा विचार करत असाल तर पैसे वाचवण्यासाठी महत्वाच्या ठरतील…
Table of contents [Show]
पेटसाठी अनुकूल राहण्याची सोय
हे लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पेटसोबत ट्रीपवर जाणार असाल तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या पेटचा विचार करावा लागणार आहे. ज्या कुठल्या महिन्यात तुम्ही पिकनिकला जायचा विचार करत असाल त्या महिन्यातील तापमान, हवामान कसे असेल याचा अभ्यास करा. त्यानुसार तुमचे नियोजन ठरवा नाही तर पेटसोबतचा तुमचा हा प्रवास महागाचा ठरू शकतो. कारण नवीन ठिकाणी रुळायला पेटला काहीसा कालावधी द्यावा लागतो. तसेच सर्व हॉटेल्स हे पेट्स फ्रेंडली नसतात, तिथे पाळीव प्राण्यांना ठेवायला अनुमती नसेल तर तुमचे बुकिंग वाया जावू शकते. म्हणून हॉटेल बुकिंग करण्याआधी ते पेट्स फ्रेंडलीआहेत की नाही हे जाणून घ्या.
पेट्सची खाण्याची व्यवस्था
प्रवासात तुम्हाला तुमचा अतिरिक्त खर्च टाळायचा असेल तर तुमच्या पेट्सला जे जे काही खायला लागतं, ते ते सोबत घेऊन चला. पेट्सचे जेवण, औषधे, कपडे, साबण आदी वस्तू आधीच पॅक करून ठेवा. तसेच पेट्सला स्थानिक पदार्थ खायला देऊ नका. पेट्सची तब्येत बिघडल्यास तुमचा मूड खराब तर होईलच पण आर्थिक भर वाढेल ते वेगळं. तुम्ही ज्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणार आहात त्याच्या आसपासची पशुवैद्यकीय दवाखाने आधीच शोधून ठेवा.
पर्यायाने स्वस्त वाहनांचा विचार करा
खरे तर पेट्सला बाहेर कुठे प्रवासासाठी घेऊन जाताना खूप बारीक नियोजन करावे लागते. भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत म्हणजेच मेट्रो, ट्रेन, बस आदींमध्ये पाळीव प्राण्यांना अनुमती नाही. रेल्वेचे काही खास नियम आहेत ज्याद्वारे तुम्ही पाळीव प्राण्यांना तुमच्या सोबत घेऊन जावू शकता, मात्र यासाठी तुम्हाला बराचसा खर्च येऊ शकतो. बरेच पेट पॅरेंट्स त्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करतात. ज्याद्वारे पेट्सची निगा राखणे सोयीस्कर ठरते.
ठिकाणांची निवड
फिरायला जाताना अशीच काही ठिकाणे निवडली पाहिजेत जी कमी खर्चिक असतील आणि जिथे प्राण्यांना घेऊन जाता येईल. जर तुम्ही समुद्र किनारी, डोंगर भागात जर फिरायला गेलात तर तिथे प्राण्यांना देखील घेऊन जाण्याची परवानगी असते. अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या पेट्ससोबत ट्रीप एन्जॉय करू शकता.
पेट सिटिंग एक्सचेंजेस
आता तर ठाणे, मुंबई, पुणे या शहरात पेट सिटिंग एक्सचेंजेस ही संकल्पना जोर धरू लागली आहे. तुमच्या परिसरातील पेट पॅरेंट्सचा एक ग्रुप बनवून तुम्ही एकमेकांना सहकार्य करू शकता. जर कुठे तुम्हाला अत्यावश्यक कामासाठी जावे लागले किंवा पेटला कुठल्या ट्रीपवर नेणे शक्य नसेल तर तुम्ही पेट सिटिंग एक्सचेंजचा पर्याय निवडू शकता. पेट्सची खाण्यापिण्याची व्यवस्था करून तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जाऊ शकता. बऱ्याच ठिकाणी ही सुविधा सशुल्क स्वरूपात सुरु झालीये.
हेच नाही तर काही हॉटेल्स आणि वाहतूक सेवा पाळीव प्राणी असलेल्या प्रवाशांसाठी सवलत किंवा जाहिराती देतात. युरोपियन देशांमधील हा ट्रेंड आता पुण्या-मुंबईत देखील सुरु झाला आहे. असे काही पॅकेज तुमचा प्रवासाचा खर्च कमी करू शकतात. या सगळ्या टिप्सचा जर पद्धतशीर अवलंब केला तर तुमच्या पेटला सोबत घेऊन कुठल्या ट्रीपवर जायचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या पैशाची नक्कीच बचत होऊ शकेल.