आजकाल प्रिंटर हे घर आणि ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे साधन बनले आहे. आजकाल मुलांच्या अभ्यासासाठी, ऑफिसच्या कागदपत्रांसाठी आपल्याला प्रिंटर हवाच असतो. बाहेर स्टेशनरीच्या दुकानात गेलं तर एका पेजमागे 3 ते 5 रुपये आकारले जातात. त्यामुळे घरासाठी प्रिंटर घेण्याची एक ट्रेंड सध्या सुरु आहे. अलीकडच्या काळात प्रिंटरच्या किमती देखील कमी झाल्या आहेत, त्यामुळे सामान्यांना देखील प्रिंटर घेणे परवडते आहे.
तुमच्या वापरातल्या प्रिंटरची काळजी कशी घ्यावी, त्याची निगा कशी राखावी याबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून प्रिंटरचे आयुष्य वाढेल आणि पर्यायाने तुमच्या पैशांची बचतही होईल. चला तर जाणून घेऊयात अशाच काही खास टिप्स!
नियमित स्वच्छता महत्वाची!
तुमचा प्रिंटर जर दीर्घकाळ चालावा असे तुम्हांला वाटत असेल तर तुम्ही त्याची नियमित स्वच्छता केली पाहिजे. प्रिंटरची नियमित सफाई करणे यासाठी महत्वाचे आहे. त्यावर साचलेली धूळ, कचरा तुमचे मशीन खराब करू शकतात. त्यामुळे वेळोवेळी मऊ, लिंट-फ्री कापडाने प्रिंटरची स्वच्छता करा, शक्य असल्यास व्हॅक्युम क्लिनरचा (Vacuum Cleaner) वापर करा आणि सफाई करा. कागदाचे ट्रे, रोलर्स आणि प्रिंटहेड हळुवारपणे पुसा जेणेकरुन प्रिंट काढताना क्लॉग्स आणि दाग पडणार नाहीत.
तुमच्या प्रिंटर मॉडेलशी सुसंगत उच्च-गुणवत्तेची शाई (Ink) किंवा टोनर कार्टरेज (toner cartridge) निवडा. जेनेरिक कार्टरेज सुरुवातीला किफायतशीर वाटू शकतात, परंतु ते प्रिंटींगची गुणवत्ता बिघडवू शकतात. त्यामुळे कंपनीने सुचवलेल्या ओरिजिनल कार्टरेजला प्राधान्य द्या. तसेच तुमच्या प्रिंटरसाठी उत्तम दर्जाचा, योग्य असाच कागद वापरा. कमी गुणवत्तेचा कागद वापरल्यास तुमच्या प्रिंटरमध्ये पेपर जाम होण्याच्या शक्यता वाढतात आणि प्रिंटरच्या रोलर्सवर याचा नकारात्मक परिणाम दिसू शकतो. त्यामुळे टोनर कार्टरेज
प्रिंट सेटिंग्ज चेक करा
शाई किंवा टोनरचा वापर ऑप्टिमाइझ म्हणजेच कमीत कमी करण्यासाठी तुमची प्रिंट सेटिंग्ज चेक करा. रोजच्या छपाईसाठी "ड्राफ्ट" (Draft) किंवा "इकॉनॉमी" (Economy) हा मोड निवडा. तसेच महत्त्वाच्या दस्तऐवजांसाठी उच्च-गुणवत्तेची सेटिंग्ज (High Quality Settings) निवडा. याव्यतिरिक्त, ग्रेस्केल प्रिंटिंग (Gray Scale Printing), रंगीत प्रिंटींगच्या तुलनेत कमी शाई वापरते, म्हणून आपल्या गरजेनुसारच प्रिंटींगचा ऑप्शन निवडा.
नियमित वापर करा
प्रिंटरचा अनियमित वापर न केल्यास तो खराब होऊ शकतो हे लक्षात असू द्या. प्रिंटरचे इंकजेट मॉडेल जर दीर्घ कालावधीसाठी वापरले नाही तर त्यातील शाई सुकते आणि अनावश्यक खर्च वाढतो. त्यामुळे प्रिंटरचा अनियमित वापर तुमच्याकडून होणार असेल तरच तो खरेदी करा. उगाच हौस म्हणून प्रिंटर खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नका.
यासोबतच प्रिंटर कंपनीकडून वेळोवेळी अपडेट केलेले फर्मवेअर अपडेट्स (firmware updates) नियमितपणे तपासा. यामुळे तुमचे प्रिंटर अधिक उत्तमरीत्या काम करू शकते आणि त्याची कार्यक्षमता वाढते.
या साध्यासोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या प्रिंटरची योग्यरीत्या देखभाल करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रिंटरचे आयुष्यमान तर वाढवालच, परंतु तुमच्या प्रिंटरची गुणवत्ता देखील वाढेल.