चलनी नोटा आपल्या रोजच्या व्यवहारात आपण वापरतोच. याच पैशासाठी तर आपण सगळे मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो. कुठल्याही वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी चलन म्हणून आपण भारतीय रिझर्व बँकेने छापलेल्या चलनी नोटा वापरत असतो. याच नोटा छापण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाला किती खर्च येत असेल याची माहिती तुम्हांला आहे का? जर चलनी नोटांचा छपाई खर्च जर तुम्हांला माहित नसेल तर हा लेख जरूर वाचा.
चलनी नोटा छापण्यासाठी आरबीआयला एक विशेष खर्च येतो. या खर्चाचे देखील आरबीआयला नियोजन करावे लागते. जसा सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो आहे तसाच महागाईचा सामना सध्या आरबीआयला देखील करावा लागतोय कारण नोटांच्या छपाईचा खर्च वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून चलनी नोटा बनविण्यासाठी वापरला जाणारा कागद आणि वापरली जाणारी शाई यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. या भाववाढीचा परिणाम चलनी नोटांच्या छपाईवर साहजिकच पाहायला मिळतो आहे. चला तर जाणून घेऊयात 10, 20, 50,100, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी आरबीआयला नेमका किती खर्च येतो.
भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रन लिमिटेड (BRBNML) कडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्ये 10 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 960 रुपये खर्च आला होता. म्हणजेच 10 रुपयांची एक नोट छापण्यासाठी 96 पैसे खर्च येतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक हजार रुपयांच्या 20 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 950 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच 20 रुपयांच्या एका नोटसाठी आरबीआयला 95 पैसे खर्च करावे लागतात.
तसेच RBI ला 50 रुपयांच्या 1000 च्या नोटा छापण्यासाठी 1,130 रुपये खर्च येतो. याचाच अर्थ 50 रुपयाच्या एका नोटेसाठी 1.13 रुपये इतका खर्च येतो. 10 आणि 20 रुपयाच्या छपाई खर्चापेक्षा 50 रुपयांच्या नोटेचा छपाई खर्च अधिक आहे.
रिझर्व्ह बँकेला 200 रुपयांच्या 1000 च्या नोटा छापण्यासाठी 2,370 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच 200 रुपयाच्या एका नोटेसाठी 2.3 रुपये इतका खर्च येतो. सध्या 200 रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात आहेत. या नोटांची छपाई इतर नोटांच्या तुलनेत अधिक प्रमाणात होते.
200 रुपयांच्या नोटांच्या छपाईच्या तुलनेत आरबीआयला 500 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी कमी रुपये खर्च करावे लागतात. एक हजार 500 रुपयांच्या 1000 नोटा छापण्यासाठी आरबीआयला 2,290 रुपये खर्च येतो.म्हणजेच 500 रुपयाच्या एका नोटेसाठी 2.2 रुपये खर्च RBI ला करावा लागतो.
2000 रुपयांच्या नोट छपाईसाठी आरबीआयला अधिक पैसे खर्च करावे लागतात. 2000 रुपयांच्या 1000 नोटांसाठी 3540 रुपये खर्च येतो. याचाच अर्थ 2000 रुपयांच्या एका नोटेसाठी आरबीआयला 3.54 रुपये इतका खर्च येतो. या नोटेचा छपाई खर्च इतर नोटांच्या तुलनेत सर्वात अधिक आहे.
रिझर्व्ह बँकेला 1000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 1,770 रुपये खर्च येत होता. मोदी सरकारद्वारे नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी चलनात 1000 रुपयांच्या नोटा होत्या. 8 नोव्हेंबर 2016 पासून 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्याची छपाई होत नाही.