Arijit Singh Net worth: अरिजीत सिंग या गुणी आणि प्रतिभावान गायकाला कोण ओळखत नाही? फक्त भारतातच नाही तर देशविदेशात त्याचे चाहते आहेत. एक विनम्र कलाकार म्हणून सगळ्यांचा तो आवडीचा गायक बनला आहे. अरिजीत आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करतो आहे. अरिजीत चित्रपटांसाठी, खासगी आणि सरकारी कार्यक्रमांसाठी देखील गातो. वयाच्या 18 व्या वर्षी, 2005 साली ‘फेम गुरुकुल’ या रियालिटी शो मधून अरिजीतने नशीब आजमावले. त्याचवर्षी ‘दस के दस ले गया दिल’ या रियालिटी शोचा तो विजेता ठरला आणि त्याने 10 लाख रुपयांचं बक्षीस जिंकले. यानंतर 2006 साली त्याने मुंबईत रहायचं ठरवलं आणि फ्रिलान्स म्हणून काम कारायचं ठरवलं. छोट्यामोठ्या कार्यक्रमातून अरिजीत गात राहिला, त्यांनतर 2011 साली बॉलीवुडमध्ये ‘मर्डर 2’ या चित्रपटासाठी त्याने गायलेलं पहिलं वहिलं गाणं, दिल संभल जा जरा’ हे गाणं सुपरहिट ठरलं. त्यानंतर अरिजितने मागे वळून पाहिलंच नाही. आज यशाच्या शिखरावर पोहोचलेला अरिजित करोडो रुपयांचा मालक असला तरी साधारण राहणीमान आणि जीवनशैली ही त्याची ओळख अजूनही कायम आहे.
सुरेल आवाज आणि सुरांचा बादशाह, अरिजीत सिंग हा इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक आहे. अरिजीतला आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये देखील त्याने गाणी रेकॉर्ड केली आहेत.
Between soul-stirring songs to sad bops, #ArijitSingh became an emotion for his many fans. Here's wishing the singer a very happy birthday.❤️? pic.twitter.com/sBPlYVbOaC
— Filmfare (@filmfare) April 25, 2023
कोट्यावधी संपत्तीचा मालक
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अरिजीतचा गायक म्हणून केलेला प्रवास सोपा नव्हता. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अरिजीतने स्वतःच्या कर्तुत्वाने संपत्ती कमावली आहे. चला तर जाणून घेऊयात अरिजीतच्या एकूण संपत्तीविषयी. अरिजीत हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे.अरिजीत लाईव्ह कॉन्सर्ट देखील करत असतो. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला तरुणाईचा मोठा सहभाग पहायला मिळतो. अरिजीत सिंग एका तासाच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी तब्बल 1.5 कोटी रुपये घेतो. देशविदेशात तो लाईव्ह कॉन्सर्ट करत असतो. तसेच चित्रपटात पार्श्वगायन करण्यासाठी देखील अरिजीत मोठे मानधन घेतो. एका गाण्यासाठी अरिजीत 8-10 लाख रुपये मानधन घेतो.अरिजीतच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती 7 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारतीय चलनात याचा विचार केल्यास अरिजित सिंग हा 55 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
अरिजीतची महिन्याची कमाई
अरिजीत सिंग हा इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कर भरणारा गायक आहे. तो महिन्याला 50 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावतो.अरिजीतकडे हमर, रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. 2020 साली अरिजीत सिंगने मुंबईच्या वर्सोवा परिसरात 4 फ्लॅट खरेदी केले आहेत. एकाच इमारतीत एकाच मजल्यावर हे 4 फ्लॅट आहेत. या चार फ्लॅटसाठी अरिजितने जवळपास 9 कोटी रुपये खर्च केले आहेत.
समाजकार्यात देखील अग्रेसर
अरिजीतला समाजकार्यात देखील आवड आहे. आपल्या कमाईचा काही हिस्सा तो धर्मादाय संस्थांना दान म्हणून देत असतो. त्याने स्वतः ‘लेट देअर बी लाइट’ नावाने एक एनजीओ सुरु केली असून, त्याद्वारे तो वेगवेगळे उपक्रम राबवतो. विशेषतः दारिद्र्यरेषेखालील समुदायासाठी तो काम करतो. गरजू आणि गरीब शाळकरी मुलामुलींना कपडे, पुस्तके, स्टेशनरी इत्यादींचे वाटप त्याच्या एनजीओद्वारे केले जाते.प्रसिद्धीच्या झोतात असलेला, चाहत्यांच्या गर्दीत असलेला अरिजीत समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून देखील काम करतो. त्याची हीच विशेषता त्याला इतरांपासून वेगळे बनवते. अरिजीतला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!