IRCTC भारत दर्शन: भारत हा एक असा देश आहे जिथे तुम्हांला संस्कृती, आध्यात्म्य, निसर्ग, इतिहास आणि बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात. आपला खंडप्राय देश विविधतेने नटलेला आहे.इतकी विविधता जगात कुठल्याच देशाला लाभली नसेल. हीच विविधता अनुभवायची असेल, देश बघायचा असेल, भारत दर्शन करायचं असेल तर भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी एक खास सुविधा आणली आहे. तुम्हाला माहितीच आहे की, भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यत भारतीय रेल्वे धावते. अशातच IRCTC ने भारतीय नागरिकांना देशातील धार्मिक स्थळांवर स्वस्तात पर्यटन उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'देखो अपना देश' या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशातील विविध धार्मिक स्थळांचा विकास घडवून आणण्याची योजना आखण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर या निमित्ताने पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
या योजनेअंतर्गत, भारतीय रेल्वे येत्या 28 एप्रिल रोजी एक विशेष ट्रेन चालवणार आहे, जी तुम्हाला अत्यंत कमी भाडेदरात देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे. सुमारे 10 दिवस चालणाऱ्या या प्रवासात तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता आणि धार्मिक स्थळांनाही भेट देऊ शकता. त्यासाठी तुम्हांला या ‘IRCTC भारत दर्शन’ रेल्वेचे आरक्षण करणे गरजेचे आहे.रेल्वे आरक्षण केलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
भारतीय रेलवे द्वारा पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा भारत गौरव टूरिस्ट ट्रेन का शुभारंभ 28 अप्रैल 2023 से /RAIL VISHESH/रेल विशेष#IndianRailways #TRAIN #BREAKING_NEWS https://t.co/sVitLwzGDZ@PIBHindi @RailMinIndia @RailwaySeva
— Rail Samachar Bureau (@RSBPrayagRaj) April 24, 2023
पुण्याहून सुरू होणार प्रवास
येत्या 28 एप्रिलपासून सुरु होणारा या IRCTC च्या स्पेशल ट्रेनचा प्रवास ते 7 मे पर्यंत चालणार आहे. IRCTC भारत दर्शन या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांच्या राहण्याची, खाण्याची, आणि फिरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही ट्रेन 28 एप्रिल रोजी पुण्याहून पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रेला सुरुवात करेल.
ही आहेत धार्मिक स्थळे
IRCTC ची ही खास रेल्वे 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत योजना' अंतर्गत चालवली जाणार आहे. पुण्याहून सुरू होणाऱ्या या यात्रेत जगन्नाथ पुरी, कोणार्क मंदिर (ओडिशा), बुद्धगया (बिहार), प्रयागराज, वाराणसी (उत्तर प्रदेश), कलकत्ता (पश्चिम बंगाल) आदी धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
टूर पॅकेजमध्ये काय काय असेल?
कुठली खासगी ट्रॅव्हल कंपनी जशी टूर आयोजित करते, अगदी तशीच टूर IRCTC आयोजित करणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. रेल्वे प्रवासात आणि मुक्कामात प्रवाशांना जेवण दिले जाणार आहे.रेल्वे स्टेशनहून इतर ठिकाणी जाण्यासाठी बसेस, हॉटेल, प्रवास विमा यांचा खर्च या पॅकेजमध्ये समाविष्ट असणार आहे. या संपूर्ण यात्रेसाठी 17,600 रुपये इतका खर्च येईल. एसी कोचसाठी अधिक भाडे भरावे लागणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हांला IRCTC च्या वेबसाईटवर मिळेल.