"आज माणसाचा घडीचाही भरवसा राहिला नाही" असं वाक्य कुठेही चर्चा सुरू असताना सहज तुमच्या कानी पडलं असेल. बदलती जीवनशैली, कामाचा व्याप, अपघात, अनिश्चता आणि इतरही असंख्य कारणांमुळे कोणती आणीबाणी कधी येईल सांगता येत नाही. एखाद्याचा मृत्यू होणं ही त्याच्या कुटुंबावर आलेली सर्वात मोठी आणीबाणी. ही वेळ कोणावरही आणि कधीही येऊ शकते. अशा आणीबाणीचा सामना करण्यासाठी टर्म इन्शुरन्स (Term Insurance) म्हणजेच जीवन विमा गरजेचा आहे. मात्र, चांगली टर्म पॉलिसी कशी निवडावी यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. आपल्या गरजा ओळखून योग्य पॉलिसी निवडणे कधीही योग्य ठरते. पॉलिसीची निवड करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो (Claim Settlement Ratio) आणि अमाउंट सेलटमेंट रेशो (Amount Settlement Ratio) काय आहे? हा यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तूमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हे दोन्ही रेशो तुम्ही नीट तपासायला हवेत.
क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) म्हणजे काय?
समजा एखाद्या विमा कंपनीकडे एका वर्षात 100 क्लेम म्हणजेच दावे आले. यातील 98 दावे कंपनीने पास केले आणि 2 दावे नाकारले. अशा वेळी त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो होईल 98 टक्के. बऱ्याच कंपन्या आपल्या पॉलिसीची मार्केटिंग करण्यासाठी क्लेम सेटलमेंट रेशो चांगला असल्याचा दावा करते आणि त्या आधारे जास्त ग्राहकांना पॉलिसीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. वरवर पाहता हा रेशो चांगला दिसत असला तरी फक्त CSR पाहणे पुरेशे नाही. यासाठी तुम्हाला कंपनीचा अमाउंट सेटलमेंट रेशो (ASR) काय हे देखील पाहावे लागले. एलआयसी, एचडीएफसी, आसीआयसीआय, कोटक, टाटा अशा काही टर्म इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांचे CSR रेशो 96 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
अमाउंट सेटलमेंट रेशो (ASR) म्हणजे काय?
उदाहरणार्थ, टर्म इन्शुरन्स कंपनीकडे एका वर्षात 100 दावे आले. आणि या १०० दाव्यांची किंमत 10 कोटी रुपये आहे. यातील कंपनीने 98 दावे मंजूर केले आणि दोन दावे नाकारले. मात्र, या दोन दाव्यांची किंमत प्रत्येक 50 लाख प्रमाणे 1 कोटी होती. याचाच अर्थ कंपनीने फक्त 9 कोटी रूपयांचे दावे मंजूर केले. आणि 1 कोटी रुपये किमतीचे दोन दावे नाकारले. अशा पद्धतीने अमाऊंट सेटलमेंट रेशो काढला तर तो 90 टक्के होईल. बऱ्याच वेळा कंपनी कमी किमतीचे दावे झटपट निकालात काढते आणि जास्त किंमतीचे दावे रोखून धरते. त्यामुळे कंपनीचा ASR ration तपासणे गरजेचे ठरते.
सर्वसामान्य ग्राहक फक्त क्लेम सेटलमेंट रेशो पाहून पॉलिसी खरेदी करतो. याची कंपन्यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जागरुक ग्राहक असले पाहिजे. टर्म इन्शुरन्स घेताना त्या कंपनीचा अमाउंट सेटलमेंट रेशो किती आहे हे देखील तपासायला हवे. ज्या कंपनीचा ASR कमी आहे त्या कंपनीची पॉलिसी न घेता तुम्ही ज्या कंपनीचे CSR आणि ASR चांगले आहेत. अशाच कंपन्याची पॉलिसी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
CSR आणि ASR कसा आणि कुठे तपासायचा?
पॉलिसी बझार सारख्या पोर्टलवर तुम्हाला अनेक कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो पाहायला मिळतील. याशिवाय दरवर्षी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) एक अहवाल जारी करते. त्यामध्ये सर्व विमा कंपन्यांचा ASR आणि CSR किती आहे हे पाहायला मिळेल. तसेच जेव्हा तुम्ही एखादी टर्म पॉलिसी खरेदी करत असता तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधीलाही याबाबत माहिती विचारू शकता. अनेक कंपन्यांचा रेशो पडताळून पाहून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. याशिवायही अनेक मुद्दे पॉलिसी घेताना विचारात घ्यावे लागतात. त्याचाही तुम्ही विचार करायला हवा.