Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नव्या पंतप्रधान, आव्हाने मात्र जुनीच; लिझ ट्रस आज ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारणार

British PM Liz Truss

Challenges before British PM Liz Truss: ब्रिटनमध्ये मागील काही महिन्यांपासून नव्या पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होती. अखेर लिझ ट्रस यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस शपथ घेतील.ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर असून महागाई आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान लिझ यांच्यापुढे आहे.

British PM Liz Truss: ब्रिटनमध्ये मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या पंतप्रधान निवड प्रक्रियेला अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला. कन्झर्व्हेटिव पार्टीने लिझ ट्रस (Liz Truss) यांची नेतेपदी निवड केली आणि त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या. लिझ यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा  20 हजार 927मतांनी पराभव केला. सध्या ब्रिटीश अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर असून रशिया-युक्रेन युद्धाची झळ महागाईच्या स्वरुपात ब्रिटीश नागरिकांना बसत आहे. अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कर कमी करणे, महागाई रोखण्यासाठी वाजवी दरांत ऊर्जा आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्याचे आव्हान लिझ ट्रस यांच्यापुढे आहे.

ब्रेग्झिटची अंमलबजावणी, देशांतर्गत औद्योगिक तंटे, झपाट्याने वाढणारी महागाई अर्थात यात एनर्जी बिलांमध्ये झालेली प्रचंड वाढ हा महागाई वाढण्यास ठरलेला मोठा घटक यावर नव्या पंतप्रधानांना उपाय शोधावा लागेल. ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. वीज, गॅस आणि इतर घटकांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.रशिया आणि युक्रेननंतर संपूर्ण युरोपात नॅचरल गॅस आणि क्रूड ऑईलचा पुरवठा अनियमित झाल्याने युरोपातील बहुतांश देशांना महागाईची झळ बसत आहे. ब्रिटनमध्ये एनर्जी प्राईसेसने महागाईचा आगडोंब उसळला आहे.गेल्या वर्षी घरगुती एनर्जी बिलाचा खर्च सरासरी 1,277 पाऊंड होता. तो आजच्या घडीला सरासरी 3,549 पाऊंड इतका प्रचंड वाढला आहे. एनर्जीसाठीच्या खर्चात तब्बल तीनपटीने वाढ झाली आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचारात लिझ ट्रस यांनी तातडीने कर कमी करण्याबाबत आश्वासन दिले होते. आता पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडल्याने ट्रस यांना या आश्वासनाची पूर्तता करावी लागणार आहे. लिझ ट्रस एक अर्जंट बजेट जाहीर करु शकतात, असे सूत्रांनी म्हटलं आहे. बजेटमध्ये कर कमी करणे आणि सामान्यांवरील कराचा बोजा कमी केला जाण्याची शक्यता आहे.

दि ब्रिटीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या (BCC) मते चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत महागाई दर 14% इतक्या विक्रमी पातळीपर्यंत पोहचू शकतो. 2023 मध्ये महागाई 5% इतका खाली येईल. विकास दर मात्र 3.3% इतका कमी होण्याचा अंदाज BCC ने व्यक्त केला आहे.2021 मध्ये ब्रिटनचा जीडीपी 21% इतका होता.

महागाईची आकडेवारी चिंता वाढवणारी

ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटेस्टिक्स (ONS) च्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मधील महागाईची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी फेब्रुवारी 1982 मध्ये ब्रिटनमधील महागाई दर 10.2% इतका वाढला होता. महागाईचा भडका उडण्यास खाद्य वस्तूंच्या वाढत्या किंमती कारणीभूत ठरल्या आहेत. ब्रेड, धान्य, डाळी याशिवाय दूध, चीज आणि अंडी यांच्या किंमतीत मागील दोन महिन्यात वाढ झाली आहे. बेकरी उत्पादने, भाजीपाला, मटणाच्या किंमतीत वाढ झाल्याने ब्रिटीश नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय इतर वस्तूंच्या किंमतीत देखील सातत्याने वाढ होत आहे. यात पेट फूड, टॉयलेट रोल्स, टूथब्रश, डिओ या वस्तूंच्या किंमतींनी महागाईत आणखी भर घातली आहे. हा ट्रेंड असाच सुरु राहिला तर ऑक्टोबरमध्ये महागाई दर 13.3% इतका वाढेल, असे भाकीत बँक ऑफ इंग्लंडने केले आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर भाड्याने राहणाऱ्यांना जादा भाडे द्यावे लागत आहे.क्रेडीट कार्ड आणि बँकांची कर्जे आणखी महाग झाली आहेत. ब्रिटनमधील राहणीमान सामान्य ब्रिटीश नागरिकांसाठी प्रचंड खर्चिक बनले आहे.  

कामागारांमधील असंतोषावर मार्ग काढावा लागेल

महागाईने सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ब्रिटनमध्ये रेल्वे कामगार, आरोग्य सेवक, शिक्षण, कायदेविषयक सल्लागार, वकिल अशा क्षेत्रात सरकार विरोधात असंतोष वाढला आहे. लिझ ट्रस यांना सार्वजनिक सेवांमधील ज्या क्षेत्रात कामगार संघटनांशी चर्चा करुन संपावर तातडीने तोडगा काढावा लागेल.सार्वजनिस सेवा सुरळीत झाल्यास सामान्यांना दिलासा मिळेल.  

युक्रेनबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल

मागील सात महिन्यांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेनचे युद्धाची झळ आता युरोपातील प्रमुख देशांना बसू लागली आहे. ब्रिटन (United Kingdom)हा युक्रेनला लष्करी सामुग्री देणारा मोठा पुरवठादार आहे. ब्रिटनचा युक्रेनला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका ट्रस यांनी घेतली आहे. मात्र युक्रेनला पाठिंबा देणाऱ्यांविरोधार रशिया आक्रमकपण भूमिका घेत आहे. नॅचरल गॅस आणि क्रूडचा पुरवठा खंडीत करुन ऐन हिवाळ्यात युरोपीय देशांची कोंडी करण्याचा व्लादिमीर पुतीन यांची स्ट्रॅटेजी लिझ ट्रस यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. त्यातच युक्रेनचा पाठिंबा कमकुवता झाला तर ब्रिटनसाठी अडचणी वाढू शकतात.  त्यामुळे आता पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर लिझ यांना युक्रेन संबधांबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल. 

तिसऱ्या महिला पंतप्रधान बनण्याचा बहुमान

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा आज शपथविधी होईल.हा सोहळा यावेळी स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होईल.लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.यापूर्वी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा यांनी ब्रिटनचे नेतृत्व केले होते. लिझ ट्रस मार्गारेट थॅचर यांना आदर्श मानतात.