Electricity Expenses: केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नुकतेच वीज बील आकारणीत बदल केले आहेत. त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्या वेळी AC, कूलर किवा इतर उपकरणे जास्त वापरत असाल तर तुम्हाला जास्त बील आकारण्यात येईल. कारण रात्रीच्या वेळी ऊर्जेची मागणी जास्त असते. तर दिवसा ऊर्जेची मागणी कमी असते. नव्या नियमानुसार दिवसाच्या कोणत्या वेळी ऊर्जा वापरता त्यानुसार तुम्हाला प्रति युनिट दर भरावा लागणार आहे.
टाइम ऑफ द डे चा नियम काय?
टाइम ऑफ द डे म्हणजे घरगुती ग्राहक दिवसाच्या कोणत्या वेळी विजेचा वापर करत आहेत त्यानुसार प्रति युनिट दर आकारला जाईल. (Time of day rule of electricity charge) दिवसा सोलार ऊर्जेद्वारे विजेचा जास्त पुरवठा होतो त्यामुळे दिवसा प्रति युनिट दर कमी आकारला जाईल. मात्र, रात्रीच्या वेळी औष्णिक, जलविद्युतसह इतर ऊर्जा स्रोताद्वारे वीज निर्मिती होते. ही वीज तयार होण्याचा खर्चही जास्त असतो. त्यामुळे रात्री जर तुम्ही जास्त वीज वापरत असाल तर जास्त युनिट दराने पैसे आकारले जातील.
रात्रीच्या वेळी वीज किती रुपयांनी महागणार
AC, कूलरसह इतरही उपकरणांचा वापर रात्रीच्या वेळी जास्त असतो. जर तुम्ही रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरत असाल तर तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत जास्त वीज बील आकारले जाईल. (New electricity bill rule) म्हणजेच जर 10 रुपये प्रति युनिट असेल तर रात्रीसाठी तुम्हाला 12 रुपयांपर्यंत युनिटने दर आकारला जाईल. तसेच जर तुम्ही दिवसा विजेचा वापर करत असाल तर 10 ते 20 टक्क्यांनी वीज स्वस्त होईल.
वीज बचत करण्याचे उपाय?
दिवसा इलेक्ट्रिक उपकरणांवरील घरगुती कामे जास्तीत जास्त करून घेतल्याने वीज बचत होईल. अनेक महिला रात्रीच्या वेळीही वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतात. मात्र, यापुढे रात्रीच्या वेळी तुम्ही वॉशिंग मशिनचा जास्त वापर करत असाल तर तुम्हाला जास्त बील भरावे लागेल. सोबतच इस्त्री, फ्लोअर क्लिनिंग, डस्टिंग, घरगुती पाण्याच्या मोटरचा वापर दिवसा जास्त करा. इलेक्ट्रिक उपकरणांची वेळोवेळी दुरूस्ती आणि देखभालही वीज बचतीस मदत करेल.
रात्रीच्या वेळी AC, कूलर किंवा इतर उपकरणे वापरायची वेळ आलीच तर कमी वीज वापरणारी उपकरणे खरेदी करा. प्रत्येक उपकरणावर स्टार रेटिंग दिलेले असते. जेवढे जास्त रेटिंग तेवढी वीजबचत जास्त. त्यामुळे अशी उपकरणे खरेदीला प्राधान्य द्या.
तसेच तुम्ही घरगुती विजेच्या वापरासाठी आणि पाणी गरम करण्यासाठी सोलार सिस्टिमही वापरू शकता. याचा सुरुवातीचा खर्च जास्त राहील, मात्र, दीर्घकाळात विजेची मोठी बचत होईल. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) ही संस्था वीज बचतीच्या टिप्स त्यांच्या संकेतस्थळावरुन तसेच सोशल मीडिया अकाँउंटवरुन शेअर करत असते. त्या तुम्ही फॉलो करू शकता.
नवा बील आकारणीचा नियम कधीपासून लागू होईल?
ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर आहे त्यांच्यासाठी हा नियम तत्काळ लागू होणार आहे. मात्र, इतर ग्राहकांना एप्रिल 2025 पासून हा नवा नियम लागू होईल.